याला कर्जमाफी म्हणायचं की कर्जवसुली: अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी चार कोटी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमावरही पवार यांनी यावेळी टीका केली. "जे शिवसेना-भाजपचे मंत्री एकमेकांना पाण्यात पाहतात त्यांनी लावलेली झाडे कशी जगणार', असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीका केली आहे. "या प्रकाराला कर्जमाफी म्हणायचं की कर्जवसुली म्हणायचं?', असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

नवी मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले, "राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी बोलायचं की कर्जवसुली सुरू आहे हे बोलायाचं हेच कळत नाही. कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यापासून सरकार रोज नवा निर्णय जाहीर करत आहे. नेमका कोणता निर्णय समजायचा हेच शेतकऱ्याला कळत नाही. हे सरकार कधीपासून कर्जमाफीवर अभ्यास करतंय असे सांगत आहे. यांच्या मागून त्या उत्तरप्रदेशमध्ये योगी अदित्यनाथ महाराजाची सत्ता आली. अणि त्यांनी कर्जमाफी करूनही टाकली. हे मात्र अभ्यास करायचा आहे असं बोलत बसले आहेत. भगवे कपडे घालणाऱ्याला अभ्यासाची गरज वाटली नाही, मग जॅकेट घालणाऱ्याला अभ्यासाची गरज का वाटते हे मला कळत नाही.'

विधिमंडळ अधिवेशनात सरकारला जाब विचारणार
कर्जमाफीच्या निर्णयाबाबत सरकारला विधिमंडळात जाब विचारणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले. "कर्जमाफीची घोषणा झाली मात्र अंमलबजावणी कधी करणार याचा सरकारला विसर पडला आहे. कर्जमाफीची सुरुवात कधी करणार, समृद्धी महामार्गाबाबत सरकारने जाहीर केलेल्या दराबाबत शेतकरी समाधानी नाही. ज्या भागाचा विकास झाला नाही. तेथील शेतकरी कदाचित सरकारचे दर मान्य करतील. परंतु ज्या भागात विकास झालेला हा तेथील शेतकरी सरकारचा दर जाहीर करतील असे मला वाटत नाही. सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा पाच पट जास्त दर बाजाराभावाने मिळत आहे. शेतकऱ्यांवर पोलिसांच्या दंडूक्‍याचा मारा करून दबाव टाकून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही', असा इशाराही त्यांनी दिला.

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी चार कोटी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमावरही पवार यांनी यावेळी टीका केली. "जे शिवसेना-भाजपचे मंत्री एकमेकांना पाण्यात पाहतात त्यांनी लावलेली झाडे कशी जगणार', असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

वस्तू आणि सेवा कराबाबत (जीएसटी) त्यांनी टीका केली. "एक देश एक कर' या संकल्पनेला राष्ट्रवादीने साथ दिली आहे. मात्र यांच्या जीएसटी आणि पूर्वीच्या युपीए सरकारने आणलेल्या जीएसटीमध्ये फरक होता. आम्ही 18 टक्के कर वाढ प्रस्तावित केली होती. यांनी तर थेट 28 टक्‍क्‍यांवर जीएसटी नेऊन ठेवले आहे. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे व सर्वमान्यांचे कंबरडे मोडले आहे. गुजरातमध्ये जीसएसटीच्या विरोधात सर्वात मोठे आंदोलन व्यापाऱ्यांनी केले आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक पेट्रोल व डिझेलचे दर आहेत. हीच बाब राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जनतेला पटवून द्यायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले, "जुलैला भूकंप होणार आहे, असे काही जण म्हणतात. यात शिवसेनेचे मंत्री अग्रेसर आहेत. मग मुख्यमंत्र्यांनी मध्यावधी निवडणूका घेण्यास आम्हाला भाग पाडू नये, असा दम त्यांनी दिला. नंतर शिवसेनेचे नेत्यांना भाजपचे नेत सडेतोड प्रत्युतर देत आहेत.' जकात रद्द झाल्याने त्याचे नुकसान भरपाईचे पैसे देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांनी पक्षप्रमुखांच्या उपस्थित देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत चोर चोर अशी घोषणाबाजी केली. त्याची आम्ही निंदा करतो. कितीही वैचारिक मतभेद असले तरी सर्वोच्चपदाच्या व्यक्तीबाबत आपण काय बोलले पाहिजे याचे संस्कार शिवसेनेच्या नगरसेवकांवर नाहीत. सहिष्णूता, विचार व संस्कृती दाखवण्याची गरज होती. कंबरेखालचे वार करण्याचा धडा कधीच राष्ट्रवादीने त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेली नाही. जेव्हा कधीही निवडणुका येतील तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूकीसाठी सज्ज आहे, असेही तटकरे यावेळी म्हणाले.

येत्या 13 जुलैला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने राज्यव्यापी मूकमोर्चा
कोपर्डी बलात्कार प्रकरणात सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात राज्यभरातील महिला मूकमोर्चा काढणार आहोत. जळगावतून या मोर्चाला सुरूवात होईल. येत्या 13 जुलैपासून या मोर्चाला सुरूवात होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरणाची जलद गती न्यायालयात खटला चालवून न्याय देऊ असे म्हटले होते. मात्र त्या प्रकरणाचा तपास जेमतेम सुरू आहे. याचा जाब राज्य सरकारला विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Web Title: ajit pawar ncp news marathi news sakal news