सिल्कच्या साड्यांतून आकाश कंदील

साडीपासून बनवण्यात आलेले आकाश कंदील
साडीपासून बनवण्यात आलेले आकाश कंदील

मुंबई : दिवाळी सणात कंदिलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराची शोभा वाढते ती गॅलरीत किंवा वऱ्हांड्यात लावण्यात आलेल्या आकाश कंदिलाने. यंदा जरतारीचा मोर आणि वेल असलेल्या पैठणी वा सिल्कच्या साड्यांपासून बनलेले कंदील ग्राहकांचे आकर्षण ठरेल. दादरमधील ‘साडीघर’मध्ये पैठणी, इरकली आणि टंचोई सिल्कचे आकाश कंदील विक्रीस उपलब्ध आहेत. पैठणीचा जरीकाठ व बुट्टीने आकाश कंदील बनवण्यात आले आहेत.
 
‘साडीघर’चे मालक गौतम राऊत यांची साडीपासून कंदील बनवण्याची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली. गौतम यांनी त्यांचे मेहुणे सुमित नाईकडे यांच्या सोबतीने साडीचे कंदील बाजारात आणले आहेत. मागील वर्षी त्यांनी पहिल्यांदा साडीचे कंदील बाजारात आणले. त्यांना ग्राहकांकडून चांगली पसंती मिळाली. या वर्षी ग्राहकांसाठी छोट्या व मोठ्या अशा दोन आकारांत कंदील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

कंदिलाची किंमत साडीची किनार आणि पोतप्रमाणे ६५० ते १०५० रुपयांपर्यंत आहे. महिलांमध्ये ज्या साड्या नेसण्याची क्रेझ आहे त्यापासूनच कंदील बनवण्यात आले आहेत. पैठणी, म्हैसूर सिल्क, टंचोई सिल्क, बंगळुरू सिल्क, इरकली, पॉलिकॉट आदी साड्यांपासून कंदील तयार करण्यात आले आहेत. एका साडीत चार ते पाच कंदील तयार होतात. यंदा नावीन्यपूर्ण पैठणीच्या साडीच्या काठाने कंदिलाची डिझाईन बनवण्यात आली आहे. काही कंदिलांवर सोनेरी जर वापरण्यात आली आहे. काही कंदिलांवर साडीप्रमाणे स्टोन बसवण्यात आले आहेत. एक कंदील बनवण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. साडीचा कंदील पर्यावरणस्नेही आहे. दिवाळीनंतर बॉक्‍समध्ये पॅक करून दोन-तीन वर्षे तो टिकून राहतो, अशी माहिती सुमित नाईकडे यांनी दिली.

गेल्या वर्षी प्रथमच आम्ही साडीचे कंदील बाजारात आणले. जेवढे कंदील बनवले तेवढे सर्वच विकले गेले. यंदाच्या वर्षी नवरात्रीच्या पूर्वीच कंदील बनवण्याचे काम सुरू झाले. मागील वर्षी कंदील घेतलेल्या ग्राहकांनी या वेळीही बुकिंग केले आहे. या वर्षी कंदिलात वैविध्य आणले आहे. 
- गौतम राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com