ग्रंथदिंडीतून सांस्कृतिक, साहित्यिक प्रतिबिंब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

कल्याण - डोंबिवलीत शुक्रवारपासून (ता. 3) सुरू होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने होणार आहे. दिंडीतून शहरातील सांस्कृतिक, साहित्यिक वातावरणाचे प्रतिबिंब उमटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गणेश मंदिर संस्थानच्या माध्यमातून दिंडीचे समन्वयन सुरू आहे.

काही निवडक ग्रंथांची गणपती मंदिरात पूजा करून दिंडीची सुरवात होणार आहे. संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, मान्यवर साहित्यिक, शहरातील, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील पदाधिकारी, मंदिराचे पदाधिकारी दिंडीच्या अग्रस्थानी असतील. ते प्रारंभी ग्रंथाची पालखी वाहतील. त्यानंतर शहरातील काही संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते पालखीची धुरा सांभाळतील. पालखी वाहण्यासाठी पारंपरिक वेश परिधान केला जाईल.

वाचनसंस्कृती या संकल्पनेवर आधारित चित्ररथ, काही देखावे दिंडीत असतील. काही राष्ट्रपुरुष, संतांचे साहित्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यावर आधारित चित्ररथ करण्यात आले आहेत. त्यांच्यासह काही साहित्यिकांचे कटआऊटस लावण्यात येणार आहेत. दिंडीत सहभागी होणारे विद्यार्थी पारंपरिक तसेच साहित्यिकांच्या वेशभूषेत असतील. या वेळी विद्यार्थी खेळ संस्कृतीचे दर्शन विद्यार्थी घडविणार आहेत.

लेझीम, ध्वजपथक दिंडीचे आकर्षण
शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम, ध्वजपथक दिंडीचे आकर्षण ठरेल. दिंडीत नऊ हजार विद्यार्थी, साडेतीन ते चार हजार विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते असतील. नियोजनासाठी पाचशे स्वयंसेवक, शाळांमधील क्रीडाशिक्षकांची नियुक्ती केली आहे. पाच ढोल पथके, तीन बॅंड पथके दिंडी मार्गावर असतील. "संस्कार भारती'च्या रांगोळ्याही मार्गावर काढण्यात येणार आहेत.

Web Title: akhil bharatiya marathi sahitya sammelan