डोंबिवलीत अडचणींचे साहित्य संमेलन!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

ठाणे - डोंबिवली शुक्रवारपासून (ता. 3) सुरू होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कोणतीही लगबग जाणवत नाही. शहरात कुठेही स्वागताच्या कमानी नाहीत. वातावरण निर्मितीची कोणतीच हालचाल नसल्याने धुळीने आणि वाहतूक कोंडीने गजबजलेल्या शहरात संमेलन आहे तरी कुठे? असा प्रश्‍न साहित्याच्या ओढीने येणाऱ्या अन्य शहरातील साहित्यप्रेमींना पडू लागला आहे. अवघ्या काही तासांवर संमेलन येऊन ठेपले असताना संमेलन आहे की नाही, असा प्रश्‍न पडावा, इतकी साहित्यिक शांतता शहरात दिसत आहे.

एखाद्या नेत्याच्या वाढदिवसापूर्वी महिनाभर आधी फलकांवरून लोकांपर्यंत पोचणारे नेते साहित्य संमेलन साहित्यप्रेमींपर्यंत पोचवण्यासाठी मात्र पुढे सरसावलेले दिसत नाहीत. साहित्याच्या डोंबिवली नगरीत येताना साहित्यिकच संकोचून गेले आहेत. साहित्य संमेलनाची घोषणा झाल्यानंतर संमेलनाच्या पूर्वी महिनाभरापासूनच डोंबिवली संमेलनमय होईल, अशी साहित्यप्रेमींची अपेक्षा होती. मात्र, अवघे काही तास शिल्लक असतानाही शहरातील एकाही मोक्‍याच्या ठिकाणी संमेलनाची जाहिरात दिसत नाही. मुंबई-ठाणे शहरापासून काही अंतरावर असलेल्या डोंबिवलीला येणाऱ्या साहित्यप्रेमींचा या भागात पोचल्यानंतर भ्रमनिरास होत आहे.

शुभेच्छांच्या माध्यमातून चमकोगिरी...
डोंबिवली शहरातील काही भागांमध्ये नाही म्हणायला हाताच्या बोटावर मोजण्याइतके फलक लावण्यात आले आहेत. त्यांचा आकार अन्य जाहिरातींमध्येच झाकून गेला आहे. शहरातील माघी गणेशोत्सवाच्या जाहिरातीच्या तुलनेतही साहित्य संमेलनाचे फलक कमी आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी प्रायोजकांच्या मदतीने संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिका लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कार्यक्रम पत्रिका आणि साहित्यिकांच्या छायाचित्रांपेक्षा ते फलक लावण्यासाठी ज्यांनी खर्च केला आहे, अशा मंडळींनीच शुभेच्छुक म्हणून चमकून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संमेलनाच्या नावाखाली चमकोगिरी करण्याचा हा प्रकार साहित्यप्रेमींसाठी त्रासदायक आहे.

Web Title: akhil bharatiya marathi sahitya sammelan in dombivli