रसिकांचे लक्ष पहिल्या घंटेकडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई - ९८ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, पहिल्या घंटेकडे रसिकांचे लक्ष लागले आहे. अनेक मान्यवर कलाकार संमेलनास उपस्थित राहणार असून, राज्यातील शेकडो नाट्य कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

मुंबई - ९८ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, पहिल्या घंटेकडे रसिकांचे लक्ष लागले आहे. अनेक मान्यवर कलाकार संमेलनास उपस्थित राहणार असून, राज्यातील शेकडो नाट्य कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. नाट्यगृहाच्या आवारात भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. सुमारे दीड हजार प्रेक्षक मंडपात सामावले जाणार आहेत. त्याच्या कामाला वेग आला आहे. नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन बुधवारी (ता. १३) संध्याकाळी साडेतीन वाजता होणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार नाट्यसंमेलनाच्या नियोजित अध्यक्षा आहेत.

नाट्यगृहाच्या चार सभागृहांत साहित्य संमेलनातील नियोजित कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. प्रवेशद्वारावर सात कमानी उभारण्याचे आणि नाट्यगृहाच्या आवारात भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. मंडपात सुमारे दीड हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी त्याची क्षमता आहे. मंडपाचे काम मंगळवार (ता. १२)पर्यंत पूर्ण होणार आहे. नाट्यप्रेमींच्या स्वागतासाठी आवार सजविण्यास सुरुवात झाल्याची माहिती नेपथ्यकार संजय ठाकूर यांनी दिली. सुमारे १५० ते २०० ज्येष्ठ आणि नामांकित कलावंत, प्रसिद्ध व्यक्ती शिवाय हजारोंच्या संख्येने कलाकारांची यादी तयार असून, सर्वांच्या राहण्याची-भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कालिदास नाट्यगृह आणि प्रियदर्शनी हॉलमध्ये कार्यक्रम रंगणार आहेत. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व जण दिवस-रात्र काम करीत आहेत. अगदी पार्किंगपासून लाईट, कॅमेरा, आसनव्यवस्था, रंगमंच आणि हॉलमधील सजावट व कलाकारांच्या मेकअप रूमपासूनच्या बारीकसारीक गोष्टींवर भर देण्यात आला आहे. मुलुंडमध्ये होणारे ९८ वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन संस्मरणीय होण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. नाट्यसंस्कृतीचा वारसा रसिकांपर्यंत नेण्याचे काम आम्ही करीत आहोत. त्यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन स्वागत समितीचे सहसचिव प्रकाश गंगाधरे यांनी केले आहे.

Web Title: akhil bharatiya natya sammelan in mulund