कार्यक्रम पत्रिकेतील चुकांमुळे नाराजी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्याच्या दृष्टीने थोड्याच पत्रिका छापून घेण्यात आल्या आहेत. या पुढील पत्रिकेत या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही.
- गुलाब वझे, स्वागताध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

कल्याण - प्रत्येक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध विषयांवरून वाद-विवाद होतातच. डोंबिवली येथे होणारे 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही त्याला अपवाद नाही. संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेवरून कल्याण-डोंबिवलीच्या महापौरांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार आहेत. पत्रिकेत त्यांचे पद "कार्याध्यक्ष' असे छापल्याने पुन्हा एकदा आयोजकांवर टीका होत आहे.

पत्रिकेत पालिकेच्या नावाचा, त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख नसल्याने महापौर राजेंद्र देवळेकर यांनी यापूर्वीच लेखी नाराजी व्यक्त केली आहे. संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेत समारोपाचे मुख्य अतिथी म्हणून उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, असे छापले आहे; मात्र त्यांचे पद शिवसेना कार्याध्यक्ष असे छापल्याने शिवसेनेने यावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख भाऊ चौधरी यांनी या संदर्भात पत्र दिले आहे. शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे डॉक्‍टर असूनही त्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य रवींद्र फाटक यांचे आडनावही चुकीचे छापले आहे. संमेलन आयोजकांकडून झालेल्या या चुकांमुळे पक्षात नाराजी असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्याच्या दृष्टीने थोड्याच पत्रिका छापून घेण्यात आल्या आहेत. या पुढील पत्रिकेत या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही.
- गुलाब वझे, स्वागताध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

Web Title: akhil bhartiya marathi sahitya sammelan