रंग वेगळे, ढंग वेगळे, एक तरीही स्पंदन! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

ठाणे - डोंबिवलीतील 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या संमेलनगीतातून डोंबिवलीतील 50 गायक, वादक कलाकारांच्या सुरावटीचा अनुभव साहित्यप्रेमींना घेता येणार आहे. 

ठाणे - डोंबिवलीतील 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या संमेलनगीतातून डोंबिवलीतील 50 गायक, वादक कलाकारांच्या सुरावटीचा अनुभव साहित्यप्रेमींना घेता येणार आहे. 

संमेलनगीताचे प्रकाशन 26 जानेवारीस झाले असून, यू-ट्यूबच्या माध्यमातून ते मराठी रसिकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावरून या गीताचे सादरीकरण होणार आहे. या गीताने रसिकांची मने जिंकली असून, अवघ्या महाराष्ट्रात ते गुणगुणले जाईल, असा विश्‍वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. संगीतकार सुखदा भावे-दाबके यांनी या गाण्याला संगीत दिले असून, आनंद पेंढारकर यांनी या गीताचे लेखन केले आहे. डोंबिवलीतील ज्येष्ठ संगीतकार आणि गायक वसंत आजगावकर यांच्या हस्ते या सुरेल गीताचे अनावरण झाले आहे. 
डोंबिवलीत गीतकार, संगीतकार, गायक, वादक, तंत्रज्ञ, साहित्यप्रेमी, नाट्यप्रेमी आणि कलाप्रेमी मंडळी राहतात. या सर्वांचे दर्शन संमेलनगीताच्या रूपाने करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डोंबिवलीतील कलाकारांनी सर्वांसमोर यावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. साहित्य संमेलनातील विविध कार्यक्रम, संमेलनाची परंपरा याचा गौरव या गाण्यातून करण्यात आला आहे. 

डोंबिवलीतील प्रतिष्ठित गायकांबरोबरच तरुण, होतकरू गायकांनाही याद्वारे संधी देण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे. सर्व वयोगटांतील रसिकांना हे गाणे आवडावे, या हेतूने या गाण्याचे संगीत संयोजन झाले आहे. साहित्य संमेलनाचे हे गौरवगीत असून, संमेलन या व्यासपीठाचा गौरव करण्याच्या हेतूने या गाण्याची निर्मिती केल्याचे संगीतकार भावे-दाबके यांनी सांगितले. अमोघ दांडेकर आणि ऋषिराज साळवी यांनी या गाण्यासाठी वादन केले आहे, तर परीक्षित कुलकर्णी आणि आशीष गमरे यांनी गाण्याचे ध्वनिमुद्रण डोंबिवलीतील प्रभा डिजिटल स्टुडिओ येथे केले आहे. अत्यंत सुमधुर संगीताने नटलेले हे संमेलनगीत रसिकांना यू-ट्यूबच्या माध्यमातून ऐकण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. 

संमेलनगीताचा काही अंश... 
सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन 
शब्दप्रभूंचे रसिकांशी हे जीवाशिवाचे मीलन 
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन 
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन 

Web Title: akhil bhartiya marathi sammelan dombivli