नाट्य संमेलनात मध्यरात्रीनंतरच्या कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

संगीत सौभद्र मधील श्रीकृष्णाने गायलेल्या बहुत दिन नच भेटलो सुंदरीला, नच सुंदरी करू कोपा, नभ मेघाने आक्रमिले, प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी, लाल शालजोडी जरतारी या गाण्यांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात किंवा समेवर प्रतिसाद देऊन जोरकस दाद दिली.

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या पहिल्या रात्रीत संगीत सौभद्र, पंचरंगी पठ्ठे बापूराव आणि रंगबाजी या एकाहून एक सरस मैफिलींनी पंचरंग-सप्तरंगांची उधळण करीत रसिकांची झोप उडवून त्यांना तृप्त करणारी मेजवानी दिली. मध्यरात्रीनंतर झालेल्या या कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, मध्यरात्रीनंतरच्या कार्यक्रमांना किती रसिक हजेरी लावतील या शंकांना चोख प्रत्युत्तर दिले.   

बुधवारी संध्याकाळी उद्घाटन झाल्यानंतर या संमेलनात सलग ६० तास मैफिली, नाटके, परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहेत. यापैकी बुधवार व गुरुवार या दोन दिवशी रात्रभर कार्यक्रम चालणार असल्याने ते रंगतील का, त्यास किती रसिक हजेरी लावतील अशी उत्सुक्तता सर्वांना होती. मात्र उद्घाटनानंतर रात्री एक वाजता व रात्री तीन वाजता झालेल्या दोनही कार्यक्रमांसाठी दर्दी रसिक प्रेक्षकांनी निम्मे सभागृह भरले होते. कलाकारांनी ज्या ताकदीने हे कार्यक्रम सादर केले, त्याच उत्साहाने रसिकांनी न दमता रात्रभर या कलाकारांना उत्साही प्रतिसाद देत सभागृह डोक्यावर घेतले.

संगीत सौभद्र मधील श्रीकृष्णाने गायलेल्या बहुत दिन नच भेटलो सुंदरीला, नच सुंदरी करू कोपा, नभ मेघाने आक्रमिले, प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी, लाल शालजोडी जरतारी या गाण्यांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात किंवा समेवर प्रतिसाद देऊन जोरकस दाद दिली. पण नंतर पठ्ठे बापूरावांच्या रचनांवर आधारित गौळण, मुजरा, कलगी, छक्कड सुरू झाल्यावर रसिकांनी आपले पांढरपेशेपण बाजूला ठेवीत आरडाओरडा, नाच, शिट्या, वन्स मोअर चा पाऊस पाडत एकच कल्ला केला. त्यानंतरच्या रंगबाजी कार्यक्रमात श्रृंगारिक लावण्या सुरू होताच रसिकांचा कल्लोळ दुपटीने वाढला.  

पहाटे एक वाजता सुरु झालेल्या पंचरंगी पठ्ठे बापूराव कार्यक्रमातील स्मिता वेताळे, कांची शिंदे, माया खुटेगावकर यांची नृत्ये तसेच स्नेहा गायकवाड, गणेश चंदनशिवे, योगेश चिकटगावकर यांच्या पहाडी आवाजातील गीतांनी एकच धमाल उडवली. आता ग पोरी हळु चाल...जोडवं टचकंल, या गाण्यात गणेश चंदनशिवे यांनी एकीकडे हातातल्या टॅबवर बघून गाणे म्हणताना दुसरीकडे माया खुटेगावकर यांच्या बरोबरीने पदन्यास आणि ठुमके लगावून रसिकांची चांगलीच करमणूक केली. त्या दोघांचे एकमेकांना छेडणे, खुटेगावकर यांचे नखरे, हावभाव हे सारेच लाजबाब असल्याने या गाण्याला वन्समोअर मिळाला. पहाटे तीन वाजता संत तुकाराम महाराज यांच्या आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना या मैफिलीने कार्यक्रमाची सांगता झाली तेव्हा साऱ्या प्रेक्षकांनी उभे राहून कलाकारांना टाळ्यांच्या गजरात मानाचा मुजरा केला.

पहाटे चार वाजता सुरु झालेल्या रंगबाजी मधील तमाशा, लावण्यांनी कलाकार व प्रेक्षक यांच्यातच जुगलबंदी रंगली. मेघा घाडगे यांनी, घ्याल का हो राया एक शालू बनारसी, ही लावणी म्हणताना, कोण घेणार शालू अशी विचारणा रसिकांकडे बघत खुणांच्या साह्याने केली. त्यावर काही रसिकांनी, दोन शालू घेऊ की अशा खुणा करून दाखवल्या. बाई हिला झोंबतो गारवा तसेच झाल्या तीन्ही सांजा करुन शिणगार साजा या लावण्यांचा आनंदही रसिकांनी अशाच प्रकारे घेतला.

Web Title: Akhil Bhartiya Natya Sammelan in Mumbai