एटीएममधून पैसे काढताय... कार्ड क्लोन होऊ शकतं

दीपक घरत
बुधवार, 17 जुलै 2019

कार्ड क्‍लोनिंग करणारी परदेशी नागरिकांची टोळी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल परिसरात सक्रिय झाली आहे...

मुंबई : कार्ड क्‍लोनिंग करणारी परदेशी नागरिकांची टोळी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल परिसरात सक्रिय झाली आहे. जुलैच्या १५ दिवसांत तळोजा, कळंबोली आदी परिसरातील दोन एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये बसवण्यात आलेले डिव्हाईस पोलिसांच्या हाती लागले आहे. दोन्ही ठिकाणच्या सीसी टीव्ही फुटेजमध्ये डिव्हाईस बसवणाऱ्या परदेशी व्यक्ती कैद झाल्या आहेत. एटीएम मशीनला बसवण्यात आलेले डिव्हाईस बॅंक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने एटीएमचा वापर करणाऱ्या खातेधारकांचे पैसे सुरक्षित राहिले आहेत. मात्र एटीएममध्ये जाताना सावधानता बाळगणे आवश्‍यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पूर्वी मुंबई आणि नवी मुंबई परिसरात सक्रिय असलेल्या नायजेरियन नागरिकांनी आपला मोर्चा आता पनवेल परिसराकडे वळवला आहे. खारघर, तळोजा फेज- १ आणि तळोजा फेज- २ मध्ये सध्या नायजेरियन नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आले आहेत. तळोजा परिसरात बस्तान बसल्याने अमली पदार्थांची विक्री आणि ऑनलाईन फसवणुकीत हातखंडा असलेल्या नायजेरियन नागरिकांनी आपल्या करामती पनवेल परिसरात दाखवायला सुरुवात केली असल्याने अशा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनानेही कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत बॅंक खातेधारक राजेश गिरी यांनी व्यक्त केले.

एटीएम वापरताना दक्षता घ्‍या
कार्ड क्‍लोनिंग करण्यासाठी एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये डिव्हाईस बसवण्यात येते. त्याआधारे तुमच्या खात्याची माहिती चोरून तुमच्या एटीएम कार्डसारखे दुसरे कार्ड तयार केले जाते. तुमचा पूर्ण पिन नंबर मिळवण्यासाठी कॅमेऱ्याच्या माध्यमातून पिन ट्रॅक केला जातो. 

पोलिसांचे अपयश
एटीएम मशीनला डिव्हाईस लावणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही त्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. 

तक्रारीत टाळाटाळ 
डिव्हाईस लावण्यात आल्याचे लक्षात आल्यावर तक्रार करण्यात बॅंक प्रशासन टाळाटाळ करते. बॅंकेचे नाव खराब होईल या भीतीने या प्रकरणांची वाच्यता करण्यात टाळाटाळ केली जाते. 

सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत इतर सर्व प्रकारची काळजी घेण्याच्या सूचना बॅंक प्रशासनाला पोलिस वारंवार करत असतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. 
- सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळंबोली

यापूर्वी घडलेल्या घटना 

  • फेब्रुवारी २०१८ : कळंबोलीतील कॅनरा बॅंकेच्या   खातेधारकांच्या कार्डचे क्‍लोन करून १ लाख ८ हजार उकळले
  • नोव्हेंबर २०१८ : गॅस कटरच्या साह्याने खारघर तसेच तळोजा परिसरात दोन एटीएम फोडून १४ लाखाची लूट
  • एप्रिल २०१९ : नवीन पनवेल येथील डेव्हिड नावाच्या व्यक्तीचे एटीएम कार्ड क्‍लोन करून फसवणूक करण्याचा प्रयत्न
  • १ जुलै २०१९ : तळोजा औद्योगिक क्षेत्रातील एटीएम मशीनला डिव्हाईस; परदेशी नागरिक कॅमेऱ्यात कैद.
  • १५ जुलै २०१९ : कळंबोलीमधील पारसिक बॅंकेच्या एटीएम मशीनला डिव्हाईस लावल्याचे आढळून आले; परदेशी नागरिकांचा वावर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alert At ATM... Card Can Be Cloned