बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महापौरांचा कारवाईचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

काही कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये कामचुकारपणा, बेशिस्तपणा, लेटलतिफपणा वाढत चालला आहे. मात्र आता असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. यापुढे कार्यालयात आपण अचानक राऊंड मारणार असून, असे प्रकार आढळल्यास कारवाई करणार, असा इशारा महापौर लीलाबाई आशान यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

 
उल्हासनगर :  काही कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये कामचुकारपणा, बेशिस्तपणा, लेटलतिफपणा वाढत चालला आहे. मात्र आता असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. यापुढे कार्यालयात आपण अचानक राऊंड मारणार असून, असे प्रकार आढळल्यास कारवाई करणार, असा इशारा महापौर लीलाबाई आशान यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

 उल्हासनगर महापालिकेमधील कामचुकार व बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. सकाळी 10 वाजल्यानंतरही अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर नसतात. अनेक अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात विळखा घालून बसलेले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे, अशा लोकांची त्वरित उचलबांगडी करण्यात येईल, अशी तंबी महापौर आशान यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यापूर्वीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शहरविकासाची कोणतीही कामे झालेली नाहीत. मात्र माझ्या कार्यकाळात विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उल्हासनगर रेल्वेस्थानकाच्या (पूर्व) बाजूचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे. तसेच तेथे रस्तारुंदीकरणाचे कामही हाती घेण्यात येईल. याशिवाय परिवहन सेवा, मनपाची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे, असे महापौर लीलाबाई आशान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alert of mayor's action against outstanding officers and employees