अलिबाग आगारात घाणीचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

अलिबाग : अलिबाग एसटी बस आगार व स्थानकात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. वेतन न मिळाल्यामुळे कंत्राटी कामगार येत नसल्याने सर्वत्र कचरा पडला असून, बसगाड्यांची धुलाई होत नाही. त्यामुळे धूळ आणि चिखलाने माखलेल्या बसमधून प्रवास करावा लागत आहे. 

अलिबाग : अलिबाग एसटी बस आगार व स्थानकात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. वेतन न मिळाल्यामुळे कंत्राटी कामगार येत नसल्याने सर्वत्र कचरा पडला असून, बसगाड्यांची धुलाई होत नाही. त्यामुळे धूळ आणि चिखलाने माखलेल्या बसमधून प्रवास करावा लागत आहे. 

अलिबाग एसटी बस आगारात साफसफाईच्या कामासाठी महामंडळाचे दोन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. आगार व स्थानक परिसराची स्वच्छता आणि बसगाड्यांच्या धुलाईसाठी एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात कंत्राटी कामगारांची नेमणूक केली होती. या कामाचा ठेका मुंबईच्या ब्रिक्‍स कंपनीला देण्यात आला होता.

सहायक अतांत्रिक म्हणून सफाई कामगारांना अलिबाग आगारात नेमणूक देण्यात आली. मागील वर्षापासून स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्यात आली. बसगाड्या धुणे, आगार व परिसराची साफसफाई या कामांसाठी आगारात नऊ कामगार कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले. एक बस धुतल्यावर 321 रुपये आणि चौरस फूट निकषावर सफाईच्या कामाचे पैसे असे देयक दर महिन्याला एसटी महामंडळाकडून संबंधित कंपनीकडे दिले जाते. ही कंपनी कंत्राटी कामगारांना वेतन देते. 

या नऊ कामगारांचे दरमहा अडीच लाख रुपयांचे देयक एसटी महामंडळाकडून ब्रिक्‍स कंपनीला देण्यात आले; परंतु दोन-तीन महिन्यांपासून या कंत्राटी कामगारांना वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे कामगार आठ दिवसांपासून कामावर आले नाहीत. परिणामी आगारात ठिकठिकाणी कचरा साचला आहे, चिखलाने बरबटलेल्या बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

ब्रिक्‍स कंपनीमार्फत कंत्राटी स्वरूपात कामगार नेमण्यात आले आहेत. केलेल्या कामाचे देयक कंपनीला देण्यात आले; मात्र वेतन न मिळाल्यामुळे कामगार येत नसल्याची माहिती मिळाली. एसटी महामंडळाच्या कामगारांना स्वच्छता करण्यास सांगितले आहे. तथापि, दोन कामगार किती काम करणार, हा प्रश्‍न आहे. 
- चेतन देवधर, आगार व्यवस्थापक, अलिबाग 

मुंबईतील ब्रिक्‍स इंडिया प्रा. लि. या कंपनीमार्फत क्रिस्टल कंपनीद्वारे अलिबाग एसटी आगारात स्वच्छतेचे काम केले जाते. या कंत्राटी कामगारांचे जून ते ऑगस्टपर्यंतचे वेतन थकले आहे. वेतन न मिळाल्यामुळे कामगारांना कामावर बोलावणेही चुकीचे आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात आलेला नाही. 
- रोहन रत्नाकर, पर्यवेक्षक 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alibag agar dirt kingdom