अलिबाग-रोहा महामार्ग खड्डेमय; आक्रमक ग्रामस्थांचा रस्ता रोकोचा इशारा

अलिबाग-रोहा महामार्ग खड्डेमय; आक्रमक ग्रामस्थांचा रस्ता रोकोचा इशारा


अलिबाग ः अलिबाग - रोहा मार्गावरील घोटवडे ते बोरपाडा या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याचा धोका येथे आहे. नागरिकांनी रस्ते दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा वाहनचालकांचा आरोप आहे. आता या खड्डेमय रस्त्याबाबत नागरिकांनी ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेतली असून येत्या 9 नोव्हेंबरला बोरपाडा ते घोटवडे रस्त्यावर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

अलिबाग - रोहा हा राज्य महामार्ग म्हणून ओळखला जातो. दोन तालुक्‍यांना जोडणाऱ्या या मार्गावरील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. मणक्‍याचे आजारही वाढू लागले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांसह चालकांना जीव मुठी घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. या खड्डयांबाबत वेगवेगळ्या राजकिय पक्षासह सामाजिक संघटनांद्वारे निवेदने देऊन रस्ते दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. परंतू प्रत्यक्षात ठोस अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली नाही.

तात्पूरत्या स्वरुपात मातीची भर टाकून खड्डे बूजविण्याचे काम करून दिलासा देण्याचा केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भुमिकेबाबत नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. रोहा - अलिबाग मार्गावरील नागरिकांनी एकत्र या खड्डेमय रस्त्याबाबत आक्रमक भुमिका घेतली आहे. 30 ऑक्‍टोबरपर्यंत रस्ते दुरुस्तीबाबत मागणी केली आहे. अन्यथा ग्रामस्थ म्हणून सर्वजण एकत्र येऊन रास्ता रोको करणार असल्याचा इशारा वरंडेचे सरपंच सुधीर चेरकर यांनी दिला आहे. 

खड्डेमय रस्त्यामुळे खुप त्रास होत आहे. कोणीही याकडे लक्ष दयायला तयार नाही. त्यामुळे स्वतःहून पुढाकार घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला 30ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिली आहे. बेलकडे ते कुदे येथील हजारो नागरिक व महिला या आंदोलनात सहभागी होणार आहे. गावोगावी नागरिकांच्या भेटी घेऊन या आंदोलनाबाबत चर्चा सुरु केल्या आहेत. 
सुधीर चेरकर,
सरपंच, ग्रामपंचायत वरंडे

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com