
Raigad : रायगड जिल्ह्यात तापमानवाढीने पशूधनावर संकट
अलिबाग, : जिल्ह्यात उष्णतेची लाट दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशातच पावसाळ्यानंतर आता उन्हाळ्यात होणाऱ्या विषाणूजन्य रोगांमुळे जिल्ह्यातील पशुधनावर नवे संकट ओढवले आहे. त्यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कामाला लागला असून गावागावात लसीकरणाला वेग आला आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्याचे तापमान वाढले आहे. कधी ढगाळ वातावरण; तर कधी उन्हाचे चटके अशा बदलत्या वातावरणामुळे पशुधनाचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
वाढत्या उष्णतेमुळे मिळेल तेथे पाणी पिऊन पाळीव जनावरे आपली तहान भागवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यामुळे पाळीव जनावरांना ताप, अपचन होणे, प्रकृती खालावणे अशा लाळखुरकत विषाणूंच्या संसर्गाचा धोका बळावला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील गाय व म्हैस अशा वर्गातील दोन लाख ३९ हजार १३१ इतक्या पशुधनांसाठी दोन लाख १५ हजार २०० लसीच्या मात्रा पशू विभागाकडे उपलब्ध झाल्याने लसीकरणाचे काम सुरू आहे.
लाळखुरकत हा विषाणूजन्य आजार गाय व म्हैस वर्गातील जनावरांना होण्याची शक्यता अधिक असते. पशुधनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरणाचे काम वेगात करण्यात आले. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
- डॉ. राजेश लाळगे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय अलिबाग