अलिबाग समुद्रकिनारी तिघे बुडाले ; मृत तरुण कोपरखैरणेतील रहिवासी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

समुद्रात पोहण्याची हौस जीवावर बेतलेल्या आशिष मिश्रा याने मर्चंट नेव्हीचा; तर सुहाद सिद्धिकीने मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला होता. तसेच चैतन्य सुळेने सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे. हे तरुण समुद्रात बुडाल्याचे वृत्त समजताच कोपरखैरणे परिसरात शोककळा पसरली आहे. 

अलिबाग : येथील नागाव बीचवर फिरण्यासाठी गेलेले कोपरखैरणेतील तीन तरुण समुद्रात बुडाल्याची घटना काल (ता. 25) सकाळी घडली. यातील सुहाद सिद्दिकी (21) आणि आशिष मिश्रा (20) या दोघांचे मृतदेह आज कोर्लाई खाडीत सापडले; मात्र चैतन्य सुळे (20) या तरुणाचा रात्री उशिरापर्यंत थांगपत्ता लागला नाही. 

तिघेही कोपरखैरणे सेक्‍टर- 17 व 20 या भागातील रहिवासी असून त्यांचा 13 जणांचा ग्रुप काल फिरण्यासाठी अलिबाग येथे गेला होता. काल दुपारी ते वरसोली बीचवर गेले होते. नंतर सायंकाळी 6.30 च्या सुमारास नागाव बीचवर गेले. या वेळी पोहोण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले असता, भरतीमुळे समुद्राचे पाणी वाढत गेले. सुहाद, आशिष व चैतन्य या तिघांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज आला नाही. इतर तरुण बाहेर आल्यानंतर त्यांना हे तिघे समुद्राच्या पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. त्यांनी अलिबाग पोलिसांना घटनेची खबर दिली. त्यानंतर स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली;

मात्र काल रात्री कोणाचाही थांगपत्ता लागला नव्हता. अखेर आज सकाळी 10 च्या सुमारास नागाव बीचपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोर्लाई खाडीत सुहादचा; तर आग्रव येथे आशिषचा मृतदेह सापडला; मात्र चैतन्यचा आज उशिरापर्यंत थांगपत्ता लागू शकला नाही. 

तिन्ही तरुण उच्चशिक्षित 

समुद्रात पोहण्याची हौस जीवावर बेतलेल्या आशिष मिश्रा याने मर्चंट नेव्हीचा; तर सुहाद सिद्धिकीने मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला होता. तसेच चैतन्य सुळेने सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे. हे तरुण समुद्रात बुडाल्याचे वृत्त समजताच कोपरखैरणे परिसरात शोककळा पसरली आहे. 

Web Title: Alibaug sea drowning three dead