
Alibaug : पाण्यासाठी खारेपाटातील महिला आक्रमक
अलिबाग : जलजीवनच्या योजनांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका अलिबाग तालुक्यातील खारेपाटमधील नागरिकांना बसत आहे. वैजाळी, रेवस, शिरवली, मानकुळे व नारंगी या ग्रामपंचायतींमधील १८ गावांसाठी कोट्यवधी रुपयांच्या जलजीवनच्या योजना राबवल्यानंतर येथील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण थांबेल, अशी आशा होती;
मात्र, यात काहीच सुधारणा न होता कंत्राटदारांने केलेल्या चुकीच्या कामामुळे पाणीटंचाईत अधिकच वाढली आहे. येथील महिलांनी पुढाकार घेऊन जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांना जाब विचारला. महिला दिनी संतप्त झालेल्या महिलांचे अखेर जिल्हा प्रशासनाला म्हणणे ऐकून घ्यावे लागले. या संतप्त महिला व ग्रामस्थांनी जलजीवन योजनांमध्ये कंत्राटदार कशाप्रकारे चुकीचे काम करीत आहेत, याचा पाढाच सीईओंपुढे वाचून दाखवले.
कोट्यवधी खर्चूनही पाणीटंचाई कमी होत नसल्याने यास जबाबदार कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सीईओने पाणीपुरवठा अभियंत्यांना दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील उर्वरित कामे योग्य पद्धतीने होतील अशी आशा नागरिक व्यक्त करू लागले आहेत. नियोजनशून्य कारभाराचा
सर्वाधिक त्रास अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील महिलांना सहन करावा लागत आहे. येथे एमआयडीसीच्या जलवाहिनीवर बेकायदा टॅप मारून ठेकेदाराने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मांडवखार येथे नळ पाणी पुरवठा योजना सुरू केली आहे.
त्यामुळे वैजाळी, रेवस, शिरवली, मानकुळे व नारंगी ग्रामपंचायतीतील अनेक गावे, वाड्यांमधील पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराचा फटका जवळपास २५ हजार नागरिकांना बसल्याने परिसरातील महिला व ग्रामस्थ संतप्त आहेत.
खासगी ठेकेदाराने मनमानी करीत रेवस झोन २ एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून बेकायदेशीर नळ जोडले आहेत. त्याचा परिणाम अन्य ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांवर होऊ लागला आहे. या गावे, वाड्यांना मुबलक पाणी पुरवठा होत नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत जाब विचारला असता, त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील महिलांचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेत पोलिस बंदोबस्त
अलिबाग पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. संतप्त झालेल्या जमावाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या महिला जेव्हा जिल्हा परिषदेवर धडकल्या तेव्हा सीईओ जिल्ह्यातील जलजीवनच्या कंत्राटदारांच्या बैठकीत व्यस्त होते. आम्ही वेळ मागूनही सीईओ आम्हाला भेटत नसल्याचे म्हणत या महिलांनी सभागृहाबाहेरच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
कंत्राटदारावर कारवाईची मागणी
जलजीवन मिशन अंतर्गत मांडवखार येथे नळपाणी पुरवठा योजनेचे काम अर्णव इंटर प्रायझेस एजन्सीमार्फत केले आहे. ठेकेदाराने परस्पर एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून बेकायदा टॅप मारून कनेक्शन टाकले आहेत. त्यामुळे पुढील ग्रामपंचायतींना पाणी मिळत नाही. जोडलेले बेकायदेशीर कनेक्शन बंद करून ग्रामपंचायतीला सुरळीत पाणी पुरवठा करावा.
व ठेकेदारावर कारवाई करावी तसेच संबंधित विभागाची परवानगी घेतल्याशिवाय पाईपलाईनवर ठेकेदार काम करणार नाही, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, ही मागणी सीईओने मान्य करीत संबंधित अधिकाऱ्यांना पोयनाड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आल्यावर स्थानिक नागरिकांचे म्हणणे अजिबात ऐकून घेत नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांची मनमानी आणखीनच वाढत जात आहे.