संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

मुंबई विद्यापीठाचे डिजिटल क्रांतीसाठी पुढचे पाऊल

मुंबई विद्यापीठाचे डिजिटल क्रांतीसाठी पुढचे पाऊल
मुंबई - 160 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा मोठ्या दिमाखात फोर्ट येथील संकुलात पार पडला. यंदा डिजिटल क्रांतीला पाठिंबा देत संपूर्ण कारभार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सहज उपलब्ध करून देण्याकडे विद्यापीठ प्रशासनाने भर दिला. विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञानावरील प्रेम पाहता विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच डिजिटल लॉकरच्या माध्यमातून मूळ गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय पदवीपर्यंतचे शिक्षण आणि फी आकारणीही आता ऑनलाईन होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.

दीक्षान्त सभागृहाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मुकेश अंबानी उपस्थित राहिले. राज्यपाल डॉ. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रावरही विशेष लोगो छापला गेला आहे. विशेष म्हणजे मोबाईलवर गुणपत्रिका उपलब्ध करून देणारे मुंबई विद्यापीठ हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकाही ऑनलाईन मागवता येईल. मुंबई विद्यापीठाची माहिती देण्यासाठी विद्यापीठाकडून मोबाईल ऍप्लिकेशनही उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांना यामधून विद्यापीठातून महत्त्वाचे संदेशही पाठवले जातील. याव्यतिरिक्त राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियानांतर्गत विद्यापीठातील कलिना व ठाणे संकुलातील सभागृहदेखील डिजिटल होणार आहेत. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये 40 व्हर्च्युअल क्‍लासरूम उपलब्ध होणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून चर्चिल्या जाणाऱ्या डिजिटल लॉकरची सुरुवात विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या डॉ. मुकेश अंबानी यांनी केली. या वेळी तंत्रज्ञानाच्या जाळ्यात ओढलेल्या तरुणाईला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नवनवीन क्रांती घडवण्याचे आवाहन अंबानी यांनी आपल्या भाषणातून केले.

विद्यार्थी हे विद्यापीठाचे पाया असतात. आजची युवा पिढी आजतागायतच्या पिढीमधील सर्वात जास्त सुशिक्षित समजली जाते. तंत्रज्ञानाला सहज आत्मसात केलेल्या तरुणांनी याच माध्यमातून देशासाठी आणि मानवतेच्या उद्धारासाठी योगदान द्यावे. जीवन स्पर्धा नसून न संपणारा प्रवास आहे जे पुन्हा मिळत नाही. त्यामुळे सकारात्मक विचारातून योग्य निर्णय घ्या, असेही ते म्हणाले.

दोन नायजेरियन विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
मुंबई विद्यापीठात यंदा दोन नायजेरियन मुलांनी दीक्षान्त सभागृहात पदवी घेतली. एलियाह संडे आणि क्‍लेमेंट फेव्हल अशी या दोघांची नावे आहेत. एलियाहने वाणिज्य शाखेत; तर क्‍लेमेंटने अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. गेली तीन वर्षे हे दोघेही मुंबईत राहत आहेत. दोघेही आता पदव्युत्तर शिक्षणही मुंबई विद्यापीठातून घेणार आहेत.

Web Title: all admission process online