esakal | महाराष्ट्रातील १३ विद्यापीठांच्या परिक्षा 'ऑनलाइन'च!

बोलून बातमी शोधा

Uday Samant
महाराष्ट्रातील १३ विद्यापीठांच्या परिक्षा 'ऑनलाइन'च!
sakal_logo
By
विराज भागवत

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतोय. राज्यात लॉकडाउनही लावण्यात आला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. अशा परिस्थितीत नियोजित वेळापत्रकानुसार जर विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी परिक्षा केंद्रावर जावं लागणार असेल तर त्यांना लॉकडाउनच्या निकषांतून सूट द्यावी लागेल. या साऱ्या परिस्थितीचा विचार करून अखेर आज महाराष्ट्रातील १३ अकृषी विद्यापीठांच्या उर्वरित सर्व परिक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. विद्यापीठांना आवश्यक त्या सोयी सुविधा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून पुरवल्या जातील पण कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि कोणताही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये, याची जबाबादारी विद्यापीठांच्या कुलगुरूंची असेल. या सर्व विद्यापीठांना दोन दिवसात या संबंधीच्या आदेशाचे पत्रक मिळेल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

"राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने परिक्षांबद्दल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. चर्चेअंती असं ठरवण्यात आलं की राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या उर्वरित परिक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील. अशा वेळी विद्यार्थी शिक्षणापासून किंवा परिक्षेपासून वंचित राहणार नाहीत याकडे सर्व कुलगुरूंनी लक्ष द्यावं. तसंच, शिक्षणाचा समावेश हा अत्यावश्यक सेवांमध्ये करावा, जेणेकरून झालेल्या परिक्षांचे मूल्यमापन व इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी शिक्षकांना मुभा मिळेल आणि परिक्षांचे निकाल लावणं सोपं जाईल", असं ते म्हणाले.

हेही वाचा: उद्धव ठाकरे-अदर पूनावाला यांच्यात बैठक; लसींच्या पुरवठ्याबाबत झाली चर्चा

"केंद्र सरकारने १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्व लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यापीठ स्तरावर सध्या महाराष्ट्रात किती मुलं आहेत याची माहिती आम्ही घेतली. 18 वर्षावरील किती विद्यार्थी शिकतात, याचा आढावा घेतला. 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या 84 लाख इतकी आहे. या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांना लसीकरण करता येईल का यासाठी प्लॅन तयार करण्यात येत आहे. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी याचा फायदा होईल", असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: "नांगरे पाटील व मंडळी फडणवीसांना भिऊ नकोस!... तुझ्या पाठीशी आहे!'

"राज्यात प्राध्यापक भरतीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्राध्यापक भरतीबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. ही भरती केवळ कोरोनाचा काळ असल्याने थांबवण्यात आली आहे. लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. ही भरती होणारच नाही असं काही लोक पसरवत आहेत, पण नवप्राध्यापकांनी याकडे लक्ष देऊ नये", अशी खात्री त्यांनी दिली.