सर्वच रुग्णालयांत अवयवदान शक्‍य 

नेत्वा धुरी 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई - अवयवदानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक पावले टाकत आहे. अवयवदानासाठी नोंदणी न झालेल्या रुग्णालयांतही रुग्णांना मेंदूमृत (ब्रेन डेड) घोषित करता येईल, असा निर्णय लवकरच होण्याचे संकेत आहेत. असे झाल्यास त्या रुग्णांना इतर नोंदणीकृत रुग्णालयांत हलविण्यात वाया जाणारा वेळ वाचेल. 

मुंबईतील झेडटीसीसीने (झोनल ट्रान्सप्लान्ट कोर्डिनेशन कमिटी) याबाबत नुकतीच बैठक घेतली. मुंबईचे क्षेत्र चार ते पाच भागांत विभागण्यात आले आहे. विभागानुसार मुंबई झेडटीसीसीतर्फे न्युरोसर्जन आणि न्युरोसर्जनफिशीयन अशा नोंदणी नसलेल्या रुग्णालयांत जातील. हे दोघे आणि त्या रुग्णालयात रुग्णावर प्रत्यक्ष उपचार करणारे डॉक्‍टर, असे चारजण मिळून या रुग्णाला मेंदू मृत घोषित करू शकतील. या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे, असे सूत्रांनी सांगितले. मुंबई झेडटीसीसीकडे विचारणा केली असता, यावर आता काही बोलणे घाईचे ठरेल, असे उत्तर मिळाले. या प्रस्तावावर काम सुरू असल्याचा दुजोरा मात्र झेडटीसीसीकडून देण्यात आला. 

अवयवदानाची प्रक्रिया सुलभ करण्याचे उपाय शोधण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांचा समावेश असलेली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने राज्यातील चारही झोनल ट्रान्सप्लान्ट कोर्डिनेशन कमिटीला याबाबतच्या नियोजनाचे आदेश दिले होते. 

अवयवदानासाठी नोंदणीकृत नसलेल्या रुग्णालयांत अवयवदान प्रक्रियेला परवानगी देण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही; परंतु याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. 
- डॉ. संजीव कुमार कांबळे, संचालक, आरोग्य संचलनालय 

Web Title: In all hospitals organ donation can be possible