#MahalaxmiExpress : 'मिशन महालक्ष्मी' फत्ते; प्रवाशांची 17 तासांनंतर सुटका (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

गरोदर महिलांची सुटका 
महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमधून नऊ गरोदर महिलांची सुटका करण्यात आली. 37 डॉक्‍टरांसह रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या होत्या. त्यात स्त्रीरोगतज्ज्ञांचा समावेश आहे. सह्याद्री मंगल कार्यालय येथे सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पुढच्या प्रवासासाठी 14 बस आणि तीन टेम्पोंची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. 

बदलापूर (जि. ठाणे) : मुसळधार पावसामुळे बदलापूर-वांगणी स्थानकांदरम्यान रुळांवर आलेल्या पाण्यामुळे काल सायंकाळपासून लोहमार्गावरच अडकलेल्या मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमधील सर्व, म्हणजे 1,050 प्रवाशांची आज तब्बल बारा तासांनंतर सुखरूप सुटका करण्यात आली. राष्ट्रीय आपत्तीनिवारण दल (एनडीआरएफ), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ), नौदल आणि स्थानिक प्रशासनाने ही कामगिरी केली. ग्रामस्थांनीही मदतीचा हात पुढे केला होता. गाडीच्या दोन्ही बाजूंना महापूरसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

या सर्व प्रवाशांना विशेष वाहतूक सेवेतून कल्याण येथे सोडण्यात आले. मात्र रेल्वे प्रशासनाच्या बेफिकीर कारभारावर प्रवाशांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. 
रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीने रौद्ररूप धारण केले होते. परिणामी, बदलापूर आणि वांगणीदरम्यान उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि रेल्वे सेवा ठप्प झाली. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून (17411 डाउन) मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्‍स्प्रेस रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी सुटली. कल्याण येथे साधारण तासाभरात पोहोचलेली ही गाडी नंतर मात्र अधिकच रखडली. बदलापूर येथे गाडीला पोहोचायला तब्बल तीन तास लागले. रात्री दोनच्या सुमारास ही गाडी चामटोली गावाजवळ थांबली; ती पुढे जाऊच शकली नाही. अडीचच्या सुमारास ही गाडी अडकली असून, येथे तातडीने मदतीची आवश्‍यकता असल्याचा संदेश प्रशासनाला कळविण्यात आला होता. रात्री अडीचच्या दरम्यान अडकलेल्या या गाडीतील प्रवाशांना काढण्यासाठी ग्रामस्थांबरोबर स्थानिक प्रशासन मदतीला लागले होते. बदलापूर, अंबरनाथ, ऑर्डनान्स फॅक्‍टरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात झाल्या होत्या. मात्र मुसळधार पाऊस आणि पाण्याच्या वाढणाऱ्या पातळीमुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या. अखेर "एनडीआरएफ,' "टीडीआरएफ' आणि नौदल यांना पाचारण करण्यात आले. 

सकाळी साडेनऊच्या दरम्यान एकेक पथक घटनास्थळी दाखल झाले. नौदलाची दोन हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाली. आठ बोटी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. तब्बल 17 तासांनंतर प्रवाशांची गाडीना बाहेर काढण्यात आले. 

रेल्वे प्रशासनाला पाण्याच्या पातळीची कल्पना होती, तर त्यांनी गाडी अंबरनाथ किंवा बदलापूर स्थानकावरच थांबवायला हवी होती. अंबरनाथ स्थानकावर गाडी आधीच सुमारे दोन तास थांबवली होती. ती त्याच स्थानकावरच थांबवली असती तर हा त्रास झाला नसता. रेल्वेच्या बेफिकिरीचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया पहिल्याच तुकडीतून बाहेर आलेल्या सर्व प्रवाशांनी व्यक्त केली. 
टिटवाळा येथील ऋचा नीलिमा घायवट या कोल्हापूरला होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी या गाडीने निघाल्या होत्या. प्रतीक धनावडे, सुरेश व सुविधा जोशी हे दांपत्य डोंबिवली येथून निघाले होते. त्यांनीही रेल्वे प्रशासनाला दोष दिला. शोभा पवार (वय 61) महिलेला दम्याचा त्रास होत होता. त्यांना बोटीतून बाहेर आणले खरे; मात्र चामटोलीचा डोंगर चढून मुख्य रस्त्यावर येईपर्यंत प्रचंड त्रास सहन करावा लागला. 

चामटोली येथील ग्रामस्थांनी प्रवाशांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्यांसाठी चहा व बिस्किटांची विनामूल्य सुविधा उपलब्ध करून दिली होती. गाडीतून बोटीने बाहेर आणताना प्रवाशांना चुकीच्या जागी आणण्यात आल्याची प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. गाडीपासून चामटोली डोंगराच्या पायथ्याशी आणण्यापेक्षा कर्जत महामार्गालगत जेथे पाणी साचले होते तेथे बोटीने नेले असते तर प्रवाशांना नाहक चार किलोमीटरची पायपीट करावी लागली नसती, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. गाडी थांबली होती तेथून कर्जत महामार्ग पन्नास मीटरवर होता. प्रवाशांना चामटोली येथून कल्याण येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महमंडळाच्या विशेष बसने सोडण्यात येत होते. रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस, ग्रामीण व शहरी पोलिस घटनास्थळी मदतीसाठी तैनात होते. एकीकडे ग्रामस्थ अडकलेल्यांना सोडविण्यासाठी जवानांना मदत करीत होते, तर दुसरीकडे बघ्यांची गर्दी सतत वाढत होती. त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना विशेष मेहनत घ्यावी लागत होती. 

सुटकेसाठी मदतकार्य सुरू होण्यापूर्वी सुमीत सायेकर, मेहबूब तांबोळी, आकाश दुबळे, गणेश पांडव, विशाल पांडव, संदीप शिंदे व सचिन रोकडे हे सात प्रवासी गाडीमधून उतरले आणि रेल्वे रुळांवरून चालत होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज येत नव्हता. ग्रामस्थांनी त्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढले. सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र साडेनऊनंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे मदतकार्यात अडथळा येत होता. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः बोटीतून घटनास्थळी जाऊन मदतकार्याची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना या बाबतीत जातीने लक्ष देण्याच्या सूचना दिल्याने प्रशासन मदत कार्यात अधिक सज्ज झाले होते. 

अमित शहांकडून प्रशंसा 
मदतपथकांनी केलेल्या कामगिरीची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रशंसा केली आहे. या पथकांनी दाखविलेले धैर्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुनील उदासी यांनी दिली. "महालक्ष्मी'तील प्रवाशांना कल्याणहून 19 डब्यांच्या विशेष गाडीने कोल्हापूरला रवाना केले जाईल, असे ते म्हणाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संपर्क साधून माहिती घेतली आणि सर्वतोपरी मदतीचे आश्‍वासन दिले. 

नौदलाची सात पथके 
वांगणी येथे महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांना "एनडीआरएफ'च्या चार पथकांनी आठ बोटींच्या साह्याने प्रवाशांना बाहेर काढले. नौदलाची सात पथके, हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर आणि लष्कराच्या चार तुकड्याही स्थानिक प्रशासनासह तैनात 
करण्यात आल्या होत्या. 

गरोदर महिलांची सुटका 
महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमधून नऊ गरोदर महिलांची सुटका करण्यात आली. 37 डॉक्‍टरांसह रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या होत्या. त्यात स्त्रीरोगतज्ज्ञांचा समावेश आहे. सह्याद्री मंगल कार्यालय येथे सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पुढच्या प्रवासासाठी 14 बस आणि तीन टेम्पोंची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. 

- सकाळी 10 : रेल्वेकडून "एनडीआरएफ'ला मदतकार्यासाठी बोलावणे. 
- दुपारी 11.45 : "एनडीआरएफ'कडून मदतकार्य सुरू. उल्हास नदीच्या पुरामुळे वांगणी परिसर जलमय. रेल्वेमार्गावरील पाण्यात वाढ. 
- दुपारी 12.08 : "एनडीआरएफ'कडून आठ प्रवाशांची सुटका. 
- दुपारी 12.10 : नौदलाचे पथक, मध्य रेल्वेचे कर्मचारी रवाना. 
- दुपारी 12:34 : नौदलाची दोन हेलिकॉप्टर वांगणीकडे रवाना. 
- दुपारी 1:37 : सुटका झालेले काही प्रवासी बदलापूर स्थानकात. 
- दुपारी 2:21 : खराब हवामानामुळे नौदल, हवाई दलाची हेलिकॉप्टर परत. 
- दुपारी 2:59 : गाडीतील 600 हून अधिक प्रवाशांची सुखरूप सुटका. 
- दुपारी 3:39 : सर्व प्रवासी सुरक्षित स्थळी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all passengers safely rescued from stranded Mahalaxmi Express