युतीच्या चर्चेत समन्वयाचे धोरण 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जानेवारी 2017

मुंबई हा शिवसेनेचा गड असून, भाजपला युती करायची असेल, तर त्यांनी ती नीटपणे करावी. शिवसेना युतीसाठी भाजपच्या मागे फरफटत जाणार नाही. 
- संजय राऊत, शिवसेना नेते 

मुंबई - मुंबई महापालिकेत युती करण्याचा संकल्प पुन्हा एकदा जोडीने सोडला जात असतानाच भाजपला अर्ध्या जागा हव्या आहेत, असे समजते. भाजपचा नवा चढाईचा धर्म बघता शिवसेनेने शांत राहत प्रथम तुमचा प्रस्ताव द्या, अशी मागणी केली असल्याने भाजप आता त्यांना हव्या असलेल्या वॉर्डांची यादी देणार आहे. आज युतीसंदर्भात झालेल्या चर्चेत यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. 

पारदर्शीपणाचा मुद्दा पुढे केल्यानंतर आज झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत भाजप नेत्यांनी त्यांचे संख्याबळ वाढल्याने नव्याने हव्या असलेल्या वॉर्डांची यादी देतो, त्यातील किती वॉर्ड देऊ शकता ते सांगा, असा प्रस्ताव पुढे केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आज शिवसेना आणि भाजपची बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात झाल्याचे समजते. भाजपने आधी प्रस्ताव ठेवावा, नंतर त्यावर भूमिका मांडू, असे शिवसेनेने प्रारंभापासूनच स्पष्ट केले असल्याने आता भाजपची नेमकी मागणी काय आहे ते कळवावे, त्यानुसार आम्ही किती जागा देता येतील ते सांगू, असे शिवसेनेने नमूद केले आहे. आज शिवसेनेतर्फे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर यांनी चर्चेत भाग घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. 

Web Title: The Alliance's policy coordination