आश्‍चर्यजनक : नवी मुंबईतील नाले एवढे स्वच्छ कसे? 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

एमआडीसीतील कारखान्यांमधून शहरातील नैसर्गिक नाल्यांत प्रदूषित सांडपाणी सोडण्यात येते, अशी तक्रार नागरिकांनी वारंवार केली आहे. नाल्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी डोळे चुरचुरणे, श्‍वास घेण्यास त्रास अशा तक्रारी केल्या होत्या.

तुर्भे  : कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे शहरातील एमआयडीसीतील कारखाने बंद आहेत. त्याचा परिणाम नवी मुंबईतील नैसर्गिक नाल्यांवर झाला आहे. आता त्यामधील पाणी नितळ, स्वच्छ झाले असून परिसरातील नागरिक वायुप्रदूषण कमी झाल्याने मोकळा श्‍वास घेत आहेत. नाल्यांच्या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. 

हे वाचा : आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले

एमआडीसीतील कारखान्यांमधून शहरातील नैसर्गिक नाल्यांत प्रदूषित सांडपाणी सोडण्यात येते, अशी तक्रार नागरिकांनी वारंवार केली आहे. नाल्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी डोळे चुरचुरणे, श्‍वास घेण्यास त्रास अशा तक्रारी केल्या होत्या. नाल्यात असणाऱ्या जीवसृष्टीवर परिणाम झाला होता; तर हे पाणी खाडीत जात असल्याने त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात मासे मृत होत असल्याच्या तक्रारी होत्या.

हे वाचा : उद्यापासून काही प्रमाणात दिलासा

काही ठिकाणी तर वृक्षांची वाढ खुंटली होती. या समस्येबाबत विधानसभेसह पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक वेळा चर्चा झाली होती, परंतु प्रदूषण रोखण्यात अपयश आले होते, परंतु कोरोनाच्या सावटामुळे एमआयडीसी बंद असल्याने नाल्यातील प्रदूषणसुद्धा कमी झाले आहे. बेलापूर उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळानेही त्यावर शिक्कामार्तब केले आहे. 
नाल्यांमधील प्रदूषण कमी झाल्याने या परिसरात आता पक्ष्यांची किलबिल वाढली आहे, अशी माहिती पक्षीप्रेमींनी दिली; तर वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या श्‍वसनाच्या आजाराचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती डॉ. किरण वळवी यांनी दिली. 

नवी मुंबईतील नाल्यात समुद्राच्या भरतीचे पाणी येत आहे. त्यामुळे ते स्वच्छ दिसत आहे. कोरोनाच्या संकटांनतर कारखाने बंद असल्याने कारखान्यांतून होणारे प्रदूषण कमी झाले आहे. त्याचाही हा मोठा सकारत्मक परिणाम आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत गांभिर्याने पाहून यापुढेही प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्‍यक आहे. 
- शाम पाटील, रहिवासी, घणसोली 
... 
जलप्रदूषण आणि वायुप्रदूषणामुळे नवजात बालके, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या शरीरावर गंभीर परिणाम होतात. आता बांधकामे आणि कारखाने बंद असल्याने स्वच्छ हवा येत आहे. नाल्यात रासायनिक द्रव्य येत नसल्याने साहजिकच नाल्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. 
- डॉ. किरण वळवी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazing: How clean the drain in Navi Mumbai?