अंबा नदी पूल धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मुंबई : मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदी दुथडी वाहत आहे. शुक्रवारी (ता. 26) रात्री वाकण-पाली मार्गावरील अंबा नदीच्या पुलावरून पाणी गेले. शनिवारी (ता. 27) पावसाचे पाणी दुपारनंतर ओसरले. पुन्हा मध्यरात्रीही पुलावरून पाणी गेले होते. त्या‍मुळे पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे वाहून गेले. पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाला आहे.

मुंबई : मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदी दुथडी वाहत आहे. शुक्रवारी (ता. 26) रात्री वाकण-पाली मार्गावरील अंबा नदीच्या पुलावरून पाणी गेले. शनिवारी (ता. 27) पावसाचे पाणी दुपारनंतर ओसरले. पुन्हा मध्यरात्रीही पुलावरून पाणी गेले होते. त्या‍मुळे पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे वाहून गेले. पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाला आहे.

वेळीच संरक्षक कठडे काढले असते तर पुलाचे नुकसान झाले नसते. पाली ग्रामपंचायतीनेही रेलिंग काढण्याची मागणी केली होती; मात्र एमएसआरडीसीने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता पूल आणखी धोकादायक झाला आहे. 

मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला अंबा नदी पूल जोडतो. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक होते. पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. लोखंडी रेलिंग व सिमेंटचे कठडेही तुटले आहेत. जूनमध्येही पुलावरून पाणी गेले होते. साधारण पाऊस सुरू झाल्यावर काही दिवसांनी पुलावरील संरक्षक कठडे एमएसआरडीसीकडून काढले जातात.

या आधी ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढले जायचे; मात्र अजूनपर्यंत ते काढले गेले नाहीत. "सकाळ'नेही यासंदर्भात काही दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध केली होती. या वेळी एमएसआरडीसी उपअभियंता सचिन निफाडे यांनी ठेकेदाराला सांगून लोखंडी रेलिंग काढतो, असे सांगितले होते; मात्र त्यानंतरही ते काढले गेले नाहीत. परिणामी पुन्हा मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी पुलावरून गेले.

पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून येणारे ओंडके, वायर, झाडाच्या फांद्या, इतर साहित्य आणि राडारोडा पुलावर अडकला. रेलिंगमध्ये अडकून पडलेल्या विविध वस्तू आणि राडारोड्यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. अशा वेळी पूल अधिक कमजोर होतो. दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे तर पुलावरील असले नसलेले संरक्षक कठडेही वाहून गेले आहेत. त्यामुळे पूल अधिकच धोकादायक झाला आहे. एमएसआरडीसीने माती भरलेले लोखंडी डबे व त्यावरील काठ्या उभ्या करून रिफ्लेक्‍टर पट्ट्या लावून तात्पुरता उपाय केला आहे. 

 

लोखंडी रेलिंग काढण्याच्या सूचना खूप आधीच ठेकेदाराला दिल्या होत्या; मात्र रेलिंगचे नटबोल्ट गंजल्याने त्यांना ते काढता आले नाहीत. उद्याच पुन्हा पुलावर योग्य संरक्षक कठडे किंवा रेलिंग बसविण्यात येतील. पाऊस संपल्यावर पाली, जांभूळपाडा आणि भालगुल येथील नवीन मोठ्या पुलांचे काम सुरू करण्यात येईल. 
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी 

पुलावरील संरक्षक कठडे काढण्याची जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. आतापर्यंत रेलिंग काढले गेले पाहिजे होते. याआधी ग्रामपंचायतीने तशी मागणीही त्यांच्याकडे केली होती. एमएसआरडीसीने वेळीच रेलिंग न काढल्यामुळे ते वाहून जाऊन पूल अधिकच धोकादायक झाला आहे. 
- गणेश बाळके, सरपंच, पाली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amba river bridge dangerous