तरुणांवर आंबेडकरी-बुद्ध विचारांचा प्रभाव कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे विचार आजच्या पिढीतील तरुणांनाही प्रेरणा देत आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. ६) शिवाजी पार्क मैदानावरील पुस्तक मेळ्यात ‘भारताचे संविधान’, ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ इत्यादी ग्रंथांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि अन्य ग्रंथांची जोरदार विक्री झाली. डॉ. आंबेडकर यांची भाषणे आणि लेखांच्या २१ खंडांना मोठी मागणी होती.

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे विचार आजच्या पिढीतील तरुणांनाही प्रेरणा देत आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. ६) शिवाजी पार्क मैदानावरील पुस्तक मेळ्यात ‘भारताचे संविधान’, ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ इत्यादी ग्रंथांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि अन्य ग्रंथांची जोरदार विक्री झाली. डॉ. आंबेडकर यांची भाषणे आणि लेखांच्या २१ खंडांना मोठी मागणी होती.

शिवाजी पार्कमध्ये सुमारे पुस्तकांचे ३० ते ४० स्टॉल उभारण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवरून संविधानाच्या १० ते १२ प्रतींची विक्री झाली. धनंजय कीरलिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र, डॉ. आंबेडकर यांचे ‘शूद्र पूर्वी कोण होते’, ‘डॉ. आंबेडकरांचा सांगाती’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गौरवगाथा’, ‘मूकनायक’, ‘सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध’, ‘रमाई’ ‘मिलिंद प्रश्‍न’ आदी पुस्तकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी मागणी होती. ‘विनिमय प्रकाशना’ने पुनर्प्रकाशित केलेल्या आचार्य प्र. के. अत्रे यांच्या ‘दलितांचे बाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाला वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला, असे राजरत्न ठोसर यांनी सांगितले. ॲट्रॉसिटी कायद्यावरील पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली, असे ‘साकेत प्रकाशना’चे प्रदीप गायकवाड म्हणाले.  

‘घरोघरी संविधान’ अभियान
घरोघरी संविधान पोहोचावे म्हणून नागपूरमधील समता सैनिक दलाने १०० रुपयांत संविधानाची प्रत उपलब्ध करून दिली. दिवसभरात संविधानाच्या सुमारे ८००० प्रती विकल्या गेल्या. संविधान मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांत उपलब्ध हाेते. 

ग्रंथविक्रेते धुळीमुळे त्रस्त
शिवाजी पार्क मैदानावर अन्नदानाच्या स्टॉलपर्यंत आच्छादन टाकण्यात आले होते. त्यापुढे पुस्तकांचे स्टॉल असलेल्या भागात मात्र जमिनीवर आच्छादन नव्हते. प्रचंड जनसमुदायामुळे उडणारी धूळ पुस्तकांवर बसत होती. विक्रेत्यांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. त्यांना पुस्तकांवरील धूळ सतत साफ करावी लागत होती. 

चला पाली शिकूया
मुंबई विद्यापीठाच्या पाली भाषा विभागाने पाली भाषेच्या अध्ययनाला प्रोत्साहन देण्यासाठी सीडी आणि डीव्हीडी विक्रीसाठी आणल्या होत्या. दोन दिवसांत पाली भाषेतील सुलेखन केलेल्या सुमारे ५००० टी-शर्टची विक्री झाली.

आम्ही दरवर्षी चैत्यभूमीवर येतो. या वर्षी पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे २१ खंड, संविधान, शूद्र पूर्वी कोण होते आदी पुस्तकांच्या आमच्याकडील प्रती संपल्या. अनुयायींचा ग्रंथांना चांगलाच प्रतिसाद मिळाला.
- वतन लाऊतकर, पुस्तक विक्रेत्या

Web Title: Ambedkar-Buddha thought influenced the youth