खराब रस्ते, स्वाईन फ्लूमुळे प्रशासनावर टीकेची झोड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

अंबरनाथ - अंबरनाथमध्ये स्वाईन फ्लूच्या शिरकावामुळे झालेले दोघांचे मृत्यू आणि उखडलेल्या रस्त्यांच्या समस्येवरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले. नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे-धांडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. 23) नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. यात सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली. 

शहर स्वच्छतेसाठी सरकारचे चार कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावणाऱ्या पालिका परिसरात रेवण शिंदे आणि ऍड. विकास चन्ने यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला, याबाबतची खंत व्यक्त करत वृषाली पाटील, अनंत कांबळे, उमर इंजिनियर, पंकज पाटील, प्रदीप पाटील या सदस्यांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली. पालिकेच्या छाया रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना जुलैचा पगार मिळाला नाही. त्यांचा पगार त्वरित देण्याची मागणी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी केली. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरूनही सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. अब्दुल शेख, उमर इंजिनियर, प्रदीप पाटील, विलास जोशी, सदाशिव पाटील, उमेश पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. यंदा पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण केलेले रस्ते वाहून गेल्याचा आरोप भरत फुलोरे यांनी केला. स्वामी समर्थ चौक ते कैलास कॉलनीपर्यंत जाणाऱ्या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याचा मार्ग बदलला. या कामात सभागृहाची दिशाभूल झाल्याचे जयश्री पाटील आणि अपर्णा भोईर यांनी निदर्शनास आणून दिले. 

गणेशोत्सवापूर्वी शहरातील खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल. छाया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत नगरविकास विभाग आणि आरोग्य विभागाकडे आवश्‍यक ती माहिती पुरवण्यात आली आहे. यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होतील. नगरविकास विभागाशी चर्चा करून लवकरच त्यांचे पगार देण्याची व्यवस्था करण्यात येईल. स्वाईन फ्लूबाबत रुग्णालयातर्फे नागरिकांत जनजागृती करण्यात आली होती. 
- देविदास पवार, मुख्याधिकारी 

Web Title: ambernath news swine flu road