अंबरनाथ तहसीलला छावणीचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

अंबरनाथ - नेवाळी येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग अद्याप कायम असतानाच नेवाळीतील महिलांचा मोर्चा अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर येणार असल्याचे समजल्यावरून पोलिस यंत्रणा सावध झाली. तहसीलदार कार्यालयाला गुरुवारी कडेकोट पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला होता. मात्र, ५ वाजेपर्यंत मोर्चा आला नसला तरी तहसील कार्यालयास पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.  

मागील आठवड्यात शेतकऱ्यांच्या जमिनीवरून निर्माण झालेल्या प्रकरणानंतर तेथील वातावरण अद्याप अशांत आहे. अशाच प्रकारचा एक मेसेज आज दुपारी सोशल मीडियावरून आला. नेवाळी येथील महिलांचा मोर्चा गुरुवारी (ता.२९) दुपारी ३ वाजता अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर येणार असल्याचे मेसेजवरून समजल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस यंत्रणा सज्ज झाली. बघता बघता तहसीलदार कार्यालय परिसरात पोलिस उपायुक्त सुनील भारद्वाज, सहायक आयुक्त दतात्रय कांबळे, निरीक्षक बाळकृष्ण वाघ, बदलापूरचे निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांच्यासह पुरुष व महिला पोलिस कर्मचाऱ्यांची जादा कुमक तैनात करण्यात आली होती. दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता; मात्र महिलांचा मोर्चा आलाच नाही.

नेवाळी परिसरातून काही महिलांचा मोर्चा अंबरनाथ तहसील कार्यालयात येणार, असा मेसेज आला. तहसीलदारांना भेटून महिलांना काही निवेदन द्यायचे असेल, चर्चा करायची असेल, असे वाटले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदरी घेण्यात आली. 

- सुनील भारद्वाज, पोलिस उपायुक्त, झोन-४.  

Web Title: ambernath tahsildar police