गुन्हेगारांचा कर्दनकाळ 'ऍम्बिस' लवकरच पोलिस दलात

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 26 मार्च 2017

मुंबई - गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयात ठोस पुरावे सादर करता यावेत, म्हणून राज्य पोलिस दलात "ऍम्बिस'प्रणाली वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रणालीमुळे आरोपीच्या बोटांचे ठसे आणि छायाचित्रे डिजिटल स्वरूपात जतन करून त्याचा वापर गुन्ह्यांचा छडा लावण्याबरोबरच गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी होईल, असा विश्‍वास गृहविभागातील सूत्रांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ऍम्बिस (Automated Multimodal Biometric Identification System) ही जगातील सर्वोत्तम प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. सुमारे 53 कोटी रुपये खर्चाची ही प्रणाली लवकरच राज्यभर सुरू करण्यात येणार आहे.

गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल होऊन तो सिद्ध करण्यासाठी आरोपीच्या बोटांचे ठसे आणि सीसी टीव्हीचे फुटेज हे शास्त्रीय पुरावे म्हणून वापरले जातात. महाराष्ट्र पोलिसांचा अंगुली मुद्रा विभाग (फिंगर प्रिंट ब्युरो) हा स्वतंत्र विभाग स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. पोलिस फॅक्‍ट-5 ही प्रणाली वापरून बोटांच्या ठशांचे विश्‍लेषण करीत होते; परंतु ही पद्धत अद्ययावत करणे आवश्‍यक होते. बोटांचे ठसे, चेहरा आणि डोळ्यांची संरचना यावरून आरोपी ओळखण्याची अद्ययावत संगणकीकृत प्रणाली हीसुद्धा पोलिस दलाची गरज होती.

ऍम्बिस प्रणालीमुळे दरोडे, चोऱ्या, खून, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणून बोटांच्या ठशांचे विश्‍लेषण आणि सीसी टीव्हीचे फुटेज पाहून चेहरा पडताळण्याची यंत्रणा पोलिस दलाला मिळणार आहे. या प्रणालीमुळे गुन्ह्यांची उकल लवकर होण्यास मदत होईल, असे पोलिस दलातील सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यातील सर्व पोलिस ठाणी "ऍम्बिस' प्रणालीशी जोडण्यात येणार आहेत. ही प्रणाली नंतर सीसीटीएनएस (द क्राईम ऍण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क्‍स ऍण्ड सिस्टिम) प्रकल्पाशी जोडली जाणार आहे. सर्व पोलिस ठाणी, जिल्हा मुख्यालय आणि राज्याच्या मुख्यालयात ही यंत्रणा असेल.

ऍम्बिस प्रणालीचा उपयोग
- आरोपींच्या बोटांचे ठसे आणि छायाचित्रांचे जतन
- आरोपींच्या डोळ्यांची संरचना, चेहरा ओळखणार
- गुन्ह्यांची उकल जलदगतीने
- गुन्हा सिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढणार

Web Title: ambis process in police team