खड्ड्यांत अडकला रुग्णवाहिकेचा श्वास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर व सायन-पनवेल महामार्गावरील हद्दीवर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे दिवसभर होणाऱ्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकांची घुसमट होत आहे.

नवी मुंबई : जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या रुग्णाला त्वरित उपचार मिळावेत, म्हणून रुग्णवाहिकांसाठी वाहतुकीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर व सायन-पनवेल महामार्गावरील हद्दीवर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे दिवसभर होणाऱ्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकांची घुसमट होत आहे. या रुग्णवाहिकांना दिघा ते वाशी हा वीस मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तास लागत आहेत; तर सानपाडा ते बेलापूर हे अंतर पार करण्यासाठी एक ते अर्धा तास लागत आहे. 

वाशी, नेरूळ, बेलापूर व ऐरोली परिसरांत अनेक महत्त्वाची खासगी रुग्णालये आहेत. अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला या रुग्णालयांत नेताना खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी हा मोठा अडथळा ठरत आहे. याशिवाय ऐरोली व दिघा परिसरातील नागरिकांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय हाकेच्या अंतरावर आहे. पण पावसाळी खड्ड्यांमुळे हेच अंतर कोसो मैलावरचे ठरत आहे. याशिवाय सध्या सायन-पनवेल महामार्ग हा खड्ड्यांनी व्यापला आहे. उन्हाळी खड्ड्यात पावसाळ्यात पोषक वातावरण मिळाल्याने हेच खड्डे आता जीवघेणे झाले आहेत. त्यातच या मार्गातून रुग्णवाहिकांसाठी रुग्णालय गाठणे म्हणजे द्राविडी प्राणायाम ठरत आहे. अनेक वेळा रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने लांबच लांब वाहनाच्या वाहतूक कोंडीचा सामना रुग्णांच्या नातेवाईकांना करावा लागतो. 

वाशी येथील मनपा रुग्णालय, हिरानंदानी, एमजीएम, वोक्‍हार्ट, याशिवाय बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमधील सुविधा अत्याधुनिक असल्याने नवी मुंबईसह पनवेल, उरण आदी परिसरातील नागरिक वाशीकडे धाव घेतात; मात्र सध्या कळंबोली ते वाशीपर्यंतच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकांना  वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. त्यामुळे अनेक रुग्णवाहिकांचे चालक हे वाहतूक कोंडीपासून सुटका मिळावी म्हणून पाम बीच मार्गाचा पर्याय निवडतात. पनवेल ते वाशीसाठी किमान दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय सर्वाधिक वाहतूक कोंडी ही शिरवणे ते सानपाडादरम्यान असल्याने हा मार्ग अनेकांना नकोसा झाला आहे. सेवारस्त्यांचीही पावसाळी खड्ड्यांनी दैना उडवून दिली आहे. त्यातच प्रत्येक वाहनचालकाला पुढे जाण्याची घाई असल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकून पडत आहेत आणि रुग्णांना उपचार मिळण्यास विलंब होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा प्रशासनाने रस्त्यांवर पडलेले खड्डे किमान पावसाळ्यात तरी बुजवावेत; जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. वाहतूक कोंडीचा फटका रुग्णसेवेला बसू लागल्याने अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णाला वेळेवर उपचार मिळण्यास विलंब होत आहे. वाहनचालकांना देखील वाहने बाहेर काढणे या खड्ड्यांमुळे अशक्‍य होऊ 
लागले आहे. 
- मधुकर शिंदे, रुग्णवाहिका चालक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulance breathing stuck in the pits