Mumbai News : डोंबिवलीत रुग्णवाहिका चालकास फेरीवाल्यांची मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance driver beaten up hawkers in Dombivli crime police mumbai

Mumbai News : डोंबिवलीत रुग्णवाहिका चालकास फेरीवाल्यांची मारहाण

डोंबिवली - क्षुल्लक कारणावरून रुग्णवाहिका चालकास दोन फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत गुरुवारी दुपारी घडली. या घटनेमुळे फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.

कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पालिका प्रधासनास दिला आहे. त्यानंतर बुधवारी पालिकेने स्टेशन परिसरातील फेरीवाल्यावर कारवाई केली.

मात्र काही तासात पुन्हा फेरीवाले आपल्या ठिकाणी येऊन बसलेले दिसून आले. यामुळे पालिकेच्या करवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, फेरीवाल्यांची दादागिरी ही किती पटीने वाढली आहे हे गुरुवारी फेरीवाल्यांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे स्पष्ट होत आहे.

डोंबिवली पूर्वेतील मधूबन टॉकीज समोर एक खासगी रुग्णालय असून या रुग्णालयात गुरुवारी दुपारी एका रुग्णाला दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका आली होती. या रुग्णवाहिकेतील चालक गणेश माळी (वय 30) हा रुग्णवाहिका मागे घेत असताना एका लादीला वाहिकेच्या चाकाचा धक्का बसला.

या कारणावरून तेथे चप्पल विक्री करणाऱ्या एका फेरीवल्याने चालक गणेश याच्याशी वाद घातला. त्यानंतर दोघांनी शिवीगाळ करत त्याला खेचून भाजी मंडईच्या एका कोपऱ्यात घरून गेले. तेथे दोघा फेरीवाल्यांनी चालक याला हाताच्या ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये चालक गणेश याच्या हाताला मार लागला आहे.

तसेच झटापटीमध्ये त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून गहाळ झाली आहे. याप्रकरणी चालक गणेश हा रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेला. रामनगर पोलिसांनी दोघा संशयित फेरीवाल्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या घटनेमुळे डोंबिवलीत फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची संख्या जास्त असून यामुळे नागरिकांना चालताना त्रास सहन करावा लागतो.

स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवा 15 दिवसांत फेरीवाले हटले नाही तर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पालिका प्रशासनास दिला होता. त्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने स्टेशन परिसरातील फेरीवाले सकाळच्या वेळी हटवत कारवाई केली.

कारवाई होऊन काही तास उलटत नाही तोच पुन्हा या परिसरात फेरीवाले आपले बस्तान मांडून बसतात. फेरीवाला विरोधी पथकाची गाडी बाजूला उभी असताना देखील फेरीवाले राजरोसपणे आपला व्यवसाय करत असल्याने त्यांना पालिकेचा कोणताही धाक नाही हे दिसून येते. त्यात शुक्कल कारणावरून रुग्णवाहिका चालकास फेरीवाल्यांनी मारहाण केल्याने फेरीवाल्यांची मुजोरी समोर आली आहे.

टॅग्स :policecrimeMumbai