नवी मुंबईकरांनो सावधान, कोरोनासह 'हे' आजारही वाढवतायत नवी मुंबईकरांची चिंता... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईकरांनो सावधान, कोरोनासह 'हे' आजारही वाढवतायत नवी मुंबईकरांची चिंता...

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येचा नवा उच्चांक गाठण्यात येत आहे.

नवी मुंबईकरांनो सावधान, कोरोनासह 'हे' आजारही वाढवतायत नवी मुंबईकरांची चिंता...

नवी मुंबई, वाशी : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येचा नवा उच्चांक गाठण्यात येत आहे. कोरोनाची टांगती तलवार नवी मुंबई शहरावर असताना बदलत्या वातावरणाच्या परिणामातून इतर विषाणूजन्य आजारांचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशी कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे; मात्र घाबरून जाऊ नका, सतर्क, राहा असे आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

पालिका प्रशासनाकडूनदेखील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करून घेण्याकडे कल अधिक आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील बाह्य रुग्ण कक्षाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा राठोड यांनी दिली. 

मोठी बातमी - मुंबईतील 'रेल्वे सेवा' कधी सुरु होणार? आता मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर...

जुलैचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. तरीदेखील शहरात पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे वातावरणही विषाणूजन्य आजाराच्या वाढीसाठी पोषक असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून ताप, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी, खोकला यांनी ग्रासलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे, तसेच ही सर्व लक्षणे कोरोना विषाणू संसर्गाचीदेखील असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे; मात्र सद्यस्थितीत प्रत्येक ताप, सर्दी, खोकल्याचा रुग्ण कोरोनाचाच असेल अशी भीती बाळगणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. 

बाह्यरुग्ण विभागात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे; मात्र सगळ्यांमध्ये आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे भय मोठ्या प्रमाणावर दिसते. मात्र, या काळात दर वर्षीच साथीच्या आजारांचे रुग्ण सापडतात, हे नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे. ताप, सर्दी, अंगदुखी जाणवल्यास तातडीने पालिकेच्या रुग्णालयामध्ये मोफत रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करून घ्यावी. जर टेस्ट निगेटिव्ह आल्यास वायरल इन्फेक्शन समजून त्यावर उपचार करून घ्यावे, असं ऐरोली सार्वजनिक रुग्णालयातील डॉ. वर्षा राठोड यांनी म्हटलंय 

मोठी बातमी - इंटरनेटवर वाचून आयुर्वेदिक काढे बनवतायत? जीवावर बेतू शकतं, आधी हे वाचा... 

तर ऐरोलीतील न्यू बोंबे रुग्णालयाचे डॉक्टर मंगेश वास्के म्हणतात, बदलत्या वातावरणामुळे साथीचे आजार वाढण्यास सुुरुवात झाली आहे. ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे वायरल इन्फेक्शनदेखील होत आहे. तरी विषाणूजन्य दुखणे आले तर डॉक्टरांचा सल्ला तातडीने घेणे महत्त्वाचे आहे.

( संपादन - सुमित बागुल )

amid corona citizens of navi mumbai are annoyed by common cold cough and body pain

loading image
go to top