कोरोना काळातही पोलि‍ओ लसीकरण मोहीम यशस्‍वी, 5 लाख 12 हजार 862 बालकांना दिलेत डोस

भाग्यश्री भुवड
Wednesday, 23 September 2020

5 लाख 12 हजार 860 बालकांना पाजण्‍यात आली पोलिओची लस, उर्वरितांनी 25 सप्‍टेंबरपर्यंत लसीकरण करुन घेण्‍याचे महापालिकेचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘कोविड19’ या संसर्गजन्‍य आजाराच्‍या अनुषंगाने नियंत्रण आणि औषधोपचार कार्यवाही सुरु असताना आरोग्‍यविषयक इतर मोहिमादेखील योग्‍यप्रकारे राबवण्‍यात येत आहेत. याचअंतर्गत ‘कोविड’ बाबत आवश्‍यक ती सर्व प्रतिबंधात्‍मक काळजी घेत 20सप्टेंबर 2020 रोजी बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात पल्स पोलिओ मोहीम यशस्‍वीपणे राबविण्‍यात आली. या मोहिमेंतर्गत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वत्र 4 हजार 797 ‘बुथ’चे आयोजन करण्यात आले होते. 

  • यासाठी 13 हजार 992 व्‍यक्‍ती कार्यरत
  • महापालिका कर्मचारी, आरोग्य स्वयंसेविका, आंगणवाडी सेविका / मदतनीस, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश
  • सर्वांना बालकांना स्‍पर्श न करता लस पाजण्‍याचे प्रशिक्षण देण्‍यात आले
  • योग्‍यप्रकारे मास्‍क वापरणे, सॅनिटायझरचा योग्‍य वापर
  • बुथवर एकावेळी कमीत-कमी व्‍यक्‍ती आणि सोशल डिस्टंसिंगचं झालं पालन 

महत्वाची बातमी : निर्गुडी, महाराष्ट्रात आढळणारं एक असं झाड ज्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे

या एक दिवसीय मोहिमेत एकूण 5 लाख 12 हजार 862 बालकांना पोलिओ लसीची मात्रा देण्यात आली. तसेच ज्‍या बालकांनी 20 सप्‍टेंबर 2020 रोजी पल्‍स पोलि‍ओ लसीचा लाभ घेतला नसेल; त्या बालकांना दुस-या टप्प्यात सलग पाच दिवस गृहभेटीद्वारे पोलिओ लसीची मात्रा देण्यात येणार आहे. यानुसार येत्‍या शुक्रवारपर्यंत म्‍हणजेच 25 सप्‍टेंबर 2020 पर्यंत पोलिओची लस देण्‍यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे. 

सध्‍या पोलियो मोहिमेचा दुसरा टप्‍पा हा 25 सप्‍टेंबर 2020 पर्यंत राबवण्‍यात येत असून, या अनुषंगाने नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, ज्या बालकांना रविवार दिनांक 20 सप्‍टेंबर रोजी पोलिओ लसीची मात्रा मिळाली नसेल, त्यांनी मोहिमेच्‍या दुस-या टप्‍प्‍यात पोलिओ लसीची मात्रा मिळेल, याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे करण्‍यात आलेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amid corona more than five lac children took polio vaccine in mumbai