आमीर साकारणार कृष्ण; शाहरुखलाही हवी होती तीच भूमिका! 

वृत्तसंस्था
शनिवार, 22 डिसेंबर 2018

'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर दाणकन आदळल्यानंतर आमीर खानने त्याच्या आगामी 'महाभारत' या चित्रपटावर लक्ष केंद्रीत केले आहे. या चित्रपटामध्ये आमीर खान कृष्णाची भूमिका करत असल्याची माहिती चक्क शाहरुख खानने दिली आहे. 

मुंबई : 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर दाणकन आदळल्यानंतर आमीर खानने त्याच्या आगामी 'महाभारत' या चित्रपटावर लक्ष केंद्रीत केले आहे. या चित्रपटामध्ये आमीर खान कृष्णाची भूमिका साकारत असल्याची माहिती चक्क शाहरुख खानने दिली आहे. 

आमीर खान 'महाभारत' हा प्रकल्प करत असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. आता आमीरने पुन्हा एकदा या प्रकल्पावर जोमाने काम सुरू केले आहे. 'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने ही माहिती दिली. 'यापुढे कुठली भूमिका करायला आवडेल', असा प्रश्‍न शाहरुखला विचारण्यात आला होता. त्यावर शाहरुखने उत्तर दिले, की 'महाभारतातील कृष्णाची भूमिका करण्याची मला इच्छा होती. पण ही भूमिका आमीर खान करत आहे. त्यामुळे आता मला ही भूमिका नाही करता येणार!' 

'महाभारत' हा चित्रपट सात भागांमध्ये करण्याचा आमीरचा मानस होता. यासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांचे बजेट होते. आता चित्रपटाऐवजी सात भागांची वेब-सीरिज करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका करण्याची ऑफर आमीरला देण्यात आली होती. 'महाभारत' करण्यासाठी आमीरने या चित्रपटास नकार दिला. त्यानंतर राकेश शर्मा यांच्या भूमिकेसाठी शाहरुखला विचारणा झाली. 

दिवाळीचा मुहूर्त साधून झळकलेल्या 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान'ला सपशेल अपयश आले. या चित्रपटात आमीरसह अमिताभ बच्चन, कॅतरिना कैफ यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

Web Title: Amir Khan Plays Krishna s role and shahrukh also wants the same