अमित शहा मुंबईत ; सरसंघचालकांशी चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

परळ परिसरातील यशवंत भवन या संघ कार्यालयात सकाळी झालेली भागवत-शहा यांची भेट सुमारे दीड तास चालली. संघ प्रथेनुसार या बैठकीचा कोणताही तपशील जाहीर करण्यात आला नाही. भाजपनेही अशा भेटी होतच राहतात, असे सांगितले.

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबईत दाखल झाले. मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर ते मुंबईत आल्याने चर्चांचे मोहोळ सुरू झाले असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या येथे मुक्‍कामास असलेल्या सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट पूर्वनियोजित होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर तयार करण्यात आलेल्या सिनेमाच्या विशेष शोसाठी शहा मुंबईत येणार होते. त्याच काळात सरसंघचालक येथे आहेत. देशातील परिस्थिती तसेच येत्या काही महिन्यांनी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात सध्या भाजपचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. ही भेटही त्या शृंखलेचाच भाग असल्याचे सांगण्यात येते. काही माहितगारांनी सिनेमा हा मोदींवरचा नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तयार करण्यात आल्याचे नमूद केले.

परळ परिसरातील यशवंत भवन या संघ कार्यालयात सकाळी झालेली भागवत-शहा यांची भेट सुमारे दीड तास चालली. संघ प्रथेनुसार या बैठकीचा कोणताही तपशील जाहीर करण्यात आला नाही. भाजपनेही अशा भेटी होतच राहतात, असे सांगितले. आंदोलनाचे राज्यावर होणारे परिणाम याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शहा यांनी चर्चा केल्याचेही समजते. राज्यात कोणताही नेतृत्वबदल संभवत नसल्याचे या अगोदरच भाजप नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

पंतप्रधानांवरील सिनेमाचा विशेष शो 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तयार करण्यात आलेल्या चित्रपटाचा रात्री उशिरा निमंत्रितांसाठी विशेष शो आयोजित केला होता. या शोला अमित शहा यांच्यासह राज्यातील सर्व बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. त्याबद्दलचा तपशील उशिरापर्यंत समजू शकला नाही. सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील काही प्रमुख नेत्यांशीही शहा यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत होते. 

Web Title: Amit Shah in Mumbai will discuss with RSS