सावरकरांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांना लाज वाटायला हवी - अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

ठाणे - जगाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव देशभक्त होते.

ठाणे - जगाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव देशभक्त होते.

अंदमानसारख्या तुरुंगामध्ये अत्याचार भोगून शिक्षा पूर्ण करणाऱ्या सावरकर यांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांना लाज वाटायला हवी, अशा शब्दांमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. देशभक्त सावरकर यांचा विरोध करणाऱ्या लोकांना सावरकर कळलेच नाहीत. त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांचा समाचार घेतला नाही तर माझे येथे येणे व्यर्थ आहे, असे ते म्हणाले.
मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, ठाण्याचे सावरकर प्रतिष्ठान आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने ठाण्यामध्ये आयोजित 29 व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आज ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये झाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून आले होते. या वेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण शहरातील खासदार आणि आमदार उपस्थित होते.

सावरकर प्रतिष्ठानचे विद्याधर ठाणेकर आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केली. अमित शहा यांनी त्यांच्या भाषणामध्ये सावरकरांचे देशभक्ती, त्यांचे वैयक्तिक जीवन, त्यांचे लेखनसंपदा, भाषाशास्त्र आणि दूरदृष्टी आदी गुणांची ओळख उपस्थितांना करून दिली. ते म्हणाले, की भारतीय तरुणांसाठी अलाहाबाद आणि प्रयागपेक्षा मोठे तीर्थस्थान हे अंदमानमधील ती कालकोठडी आहे. सावरकर हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. संपूर्ण देशभर सावरकरांवर प्रेम करणारा मोठा समाज आहे. आतापर्यंत झालेली संमेलने फक्त महाराष्ट्रात झाली असली तरी ती देशव्यापी करण्याची गरज आहे. त्यातून नव्या तरुणांना प्रेरणा मिळू शकेल.

Web Title: amit shaha talking on savarkar