अमोल पालेकर २५ वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

मुंबईत प्रयोग : ‘कुसूर’मध्ये साकारणार निवृत्त सहायक पोलिस आयुक्त दंडवतेंची भूमिका

मुंबई : एक पावसाळी रात्र... पोलिस ठाण्यातील आपत्कालीन नियंत्रण कक्ष... एक निवृत्त सहायक पोलिस आयुक्त आणि एक फोन कॉल. त्यानंतर मिनिटागणिक उलगडत जाणारे एक हिंदी नाटक. या नाटकात प्रसिद्ध चित्रकार, अभिनेते, चित्रपट-नाट्य दिग्दर्शक आणि प्रसिद्ध फिल्ममेकर अमोल पालेकर २५ वर्षांनंतर रंगभूमीवर निवृत्त सहायक पोलिस आयुक्त दंडवतेची भूमिका साकारणार आहेत. येत्या २४ नोव्हेंबरला पालेकर वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत असून, याच दिवशी मुंबईतील एनसीपीएमधील टाटा थिएटरमध्ये या थरारनाट्यात ते नाट्यरसिकांना गुंतवणार आहेत. या नाटकाचे नाव आहे "कुसूर'.

या नाटकात रसिकमनाची पकड घेणारी अनेक वळणे आहेत. आपल्या मोडकळीस आलेल्या शहरी मूल्यांचा एकेक पदर यात सोलून काढला जाईल, अशी अपेक्षा अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केली. या नाटकाचे लेखन संध्या गोखले यांनी केले असून, दिग्दर्शन पालेकर यांनी स्वत: केले आहे. सहदिग्दर्शिका संध्या गोखले आहेत.

या नाटकाची गोष्ट अनेक वळणे घेऊन, आपल्या समजुतींना धक्के देईल, गृहितके उलथून टाकेल. यातील आशय पडदा पडल्यानंतरही आपल्या मनात रेंगाळत राहील, असा विश्‍वास पालेकर यांनी व्यक्त केला. या नाटकाची निर्मिती जेएसडब्ल्यू आणि अनाम या संस्थांनी केली असून, बुक माय शोच्या सहकार्याने ते रसिकांसमोर येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amol Palekar will make thriller role