अमरावती शिवसेनेतला वाद मातोश्रीवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

शिवसेनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारीमुळेच झाल्याची तक्रार माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत अनंतराव गुढे यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले.

मुंबई : शिवसेनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारीमुळेच झाल्याची तक्रार माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत अनंतराव गुढे यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले.यावर "तो" व्हिडीओ आणि फोटो जुने असल्याचे सांगत,यामुळे कुणी दुखावले असल्यास गुढे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे समजते आहे.

खासदार नवनीत रवी राणा यांनी काढलेल्या विजय आणि आभार रॅली मधील माजी खासदार अनंतराव गुढे यांचा पत्नीने खासदार नवनित रवी राणा यांचा सत्कार करून शुभेच्छा ही दिल्या.याचे व्हिडिओ तसंच फोटोग्राफ मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हवाली करण्यात आले.अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराला शिवसैनिकांनीच पाडलं की अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारीमुळे ते पडले याची शहानिशा उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत केली.

मातोश्रीवरील बैठकीत माजी खासदार अनंतराव गुढे हे स्वता उपस्थित होते.उद्धव यांनी गुढे यांना या तक्रारींविषयी जाब विचारला असता तो व्हिडीओ निवडणुकीपूर्वीच्या एका कार्यक्रमातील असल्याचं गुढे यांनी स्पष्ट केलं.तर नवनीत राणा यांच्या शुभेच्छांचा तो फोटो ही निवडणुकीपूर्वीचा सर्वपक्षीय महाशिवरात्र कार्यक्रमातील असल्याचं सांगितलं.यानंतर उद्धव यांनी फोनवरून अभिजित अडसूळ आणि अनंतराव अडसूळ यांचा संवाद घडवून या वादावर पडदा टाकण्यास सांगितले.उद्धव ठाकरेंच्या माध्यस्तीनंतर जरी या वादावर पडदा पडला असल्याचं दिसत असलं तरी विधानसभा निवडणुकीत या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati Shivsena Litigation on Matoshri