मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून अमृता फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

तुषार सोनवणे
Wednesday, 14 October 2020

अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारी भाजपतर्फे राज्यभर प्रार्थनास्थळे उघडन्याबाबत आंदोलन केले होते. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रव्यवहाराचीही चर्चा राज्यभर झाली. याच मुद्यावरून अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

EXCLUSIVE : सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईत बेहाल; जेवणासह राहण्याची सोय नाही; एसटीच्या आवारात झोपूनच काढताहेत रात्र

कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन हळुहळु राज्य सरकार उठवत आहे. परंतु अद्याप राज्यातील प्रार्थनास्थळे बंद आहेत. प्रार्थनास्थळांठिकाणी छोटीमोठी दुकाने-व्यापारी, हातावर पोट असलेल लोकं यांचे अर्थकारण सुरू असते. गेल्या सहा महिण्यांपासून या लोकांचे अर्थकारण बंद आहे. तसेच प्रार्थनास्थळे भावनेचा मुद्दा असल्याने ते उघडण्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन केले. त्यात अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आला आहे.  त्यात त्यांनी म्हटले आहे की,  बार आणि दारूची दुकाने उघडी आहेत. तर मंदिरेच फक्त डेंजर झोनमध्ये आहेत का? आपल्या कामात असमर्थ ठरल्यानंतर तसेच  प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी काही वेळा प्रमाणपत्र नक्कीच गरजेच असतं. 

राज्यपाल  कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारात ठाकरे यांनी आपल्याला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अमृता फडणवीसांचे ट्विट हे ठाकरे यांनाच उद्देशून असल्याची प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करीत आहेत.

मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील पत्राचा वाद 

राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले की, 'तुम्ही जुनच्या पहिल्या आठवड्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील अनेक गोष्टी सुरू केल्या होत्या. लॉकडाऊनला त्रासलेल्या जनतेला त्या वाक्यामुळे दिलासा मिळाला होता. परंतु त्यानंतर 4 महिन्यानंतरही प्रार्थनास्थळे उघडलेली नाही. एकीकडे बार रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सुरू केल्यानंतरही प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहात.राज्याचे मुख्यमंत्रीपद स्विकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभु श्रीरामांचे दर्शन घेतले होते.तसेच आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन तुम्ही आरतीही केली होती. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की, ज्या सेक्युलर शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता. तो सेक्युलर शब्द तुम्ही स्विकारला आहे? देशात इतर राज्यातही प्रार्थनास्थळे सुरू झाली आहेत. परंतु त्यामुळे तेथे कोरोनाचा अधिक प्रसार झाल्याचे ऐकीवात नाही'.

हेही वाचा - सीएची परीक्षा पुढे ढकलली, परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तातडीने उत्तर देण्यात आले. त्यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की,  'महोदय, आपले प्रार्थनास्थळे उघडण्याबाबतचे पत्र मिळाले. याबाबत सरकार जरूर विचार करीत आहे.जनतेच्या भावना जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे.हे आमच्या सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. 

महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला तो योग्यच आहे. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पीओकीची उपमा देणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. आपण सेक्युलर शब्द स्विकारला का असे आपण मला विचारले आहे. तर असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजेच हिंदुत्व असणे असे आहे का? आपण राज्यपाल पदाची शपथ राज्यघटनेनुसार घेतली आहे. त्या घटनेचा गाभा सेक्युलरीझम आहे हे आपणांस मान्य नाही का? आपणास जी शिष्टमंडळे भेटली ती भारतीय जनता पक्षाशी संबधीत आहेत. हा योगायोग असावा, असो, प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत सर्व खबरदारी घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेणारच आहे. याची मी ग्वाही देतो'.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amrita Fadnavis criticizes Chief Minister Uddhav Thackeray