ब्लॅकमेलिंगप्रकरणी गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट; मविआ नेत्यांची नावं असल्याचा दावा : Amruta Fadnavis Blackmail Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis

Amruta Fadnavis Blackmail Case: ब्लॅकमेलिंग प्रकरणी गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट; मविआ नेत्यांची नावं असल्याचा दावा

मुंबई : अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंगप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हे प्रकरण साधं सरळ नसून याची सुरुवात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात मविआच्या नेत्यांची नावं समोर आली असून मुंबई पोलिसांच्या एका माजी आयुक्ताचंही नाव यात समोर आलं आहे. माध्यमांसमोर बोलताना त्यांनी प्राथमिक चौकशीतून कोणत्या बाबी समोर आल्या त्याची माहिती दिली. (Amruta Fadnavis Blackmail Case Devendra Fadnavis has big claim names of MVA leaders)

फडणवीस म्हणाले, "आम्ही आरोपींना फोनद्वारे व्यस्त ठेवत होतो. त्यामुळं अनेक बाबी रेकॉर्डवर आल्या आहेत. यामध्ये अनेक नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत. यामध्ये असं दिसून येतंय की, कदाचित महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गेल्या सात-आठ वर्षांपासून फरार असलेल्या अनिल जयसिंघानी या व्यक्तीविरोधातील केस मागे घेण्याच्या कटाची सुरुवात त्यांनी केली होती. पण सरकार बदललं त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करुन आपणं आपल्यावरील केसेस मागे घेऊ शकतो"

या प्रकरणात जो एफआयआर झाला त्यानंतर त्याचवेळी यासर्व गोष्टी रेकॉर्डवर आणल्या गेल्या. पण आम्ही एफआयआर यासाठी जाहीर केला नव्हता, कारण जो फरार व्यक्ती आहे त्याला आम्हाला पकडायचं होतं. त्यासाठी त्याच्याशी आम्ही खेळ केला. हा व्हीपीएनवरुन बोलत होता फोन नंबरवरुन बोलत नव्हता. पण हळूहळू सर्व गोष्टी बाहेर आल्या. पण याबद्दल एफआयआर झाल्या कारणानं दोन दिवसांत तो कोर्टात सादर करावा लागतो. त्यामुळं तिथून त्याची एक बातमी आली, त्यानंतर त्यावर कारवाई तर झाली पण अद्याप हा व्यक्ती सापडलेला नाही. कदाचित यामुळं तो सावध झाला असेल पण पोलिस त्याचा शोध घेत आहे, अशी माहिती यावेळी फडणवीसांनी दिली.

हे ही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

राजकारण हे सर्वात नीच पातळी पोहोचलं आहे. मी कोणावर आता थेट आरोप करणार नाही, कारण या व्यक्तीनं अशा लोकांची नावं घेतली आहेत त्यात किती तथ्थ आहे हे तपासानंतरच समोर येईल. पण त्यानं मुंबईच्या एका माजी पोलीस आयुक्ताचं नाव घेतलं आहे. पण मी जेव्हा पोलिसांकडून माहिती घेतली तेव्हा मला कळलं की, जेव्हा मविआचं सरकार होतं तेव्हा त्याच्यावरील केसेस मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली होती. त्यावर काही नोटिंगही झालं आहे. याचे जसे पुरावे मिळतील तेव्हा ते माध्यमांसमोर आणले जातील तसेच चार्जशीटमधूनही उर्वरित बाबी समोर येतील, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.