अमृता फडणवीस यांचा 'तो' सेल्फी व्हायरल

वृत्तसंस्था
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

देशात आंतरराष्ट्रीय क्रूझमधून येत्या काही वर्षांत सुमारे लाखो परदेशी पर्यटक येणार आहेत. त्यातून परकीय चलन आपल्याला मिळणार आहे. तसेच सुमारे अडीच लाख नव्या रोजगारांची निर्मिती होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

मुंबई : मुंबई-गोवा या देशातील पहिल्या लक्‍झरी क्रूझ सेवेचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, यावेळी अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या एकदम पुढे उभे राहून काढलेला सेल्फी चर्चेचा विषय ठरला.

आंग्रीया असे या अलिशान जहाजाचे नाव आहे. याबरोबरच मुंबईतील देशांतर्गत क्रूझ टर्मिनलचेही या वेळी उद्‌घाटन करण्यात आले. या सुविधांच्या विस्तारानंतर मुंबईसह महाराष्ट्राच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे. भविष्यात यामुळे अंदाजे 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल, जलवाहतूक आदी विविध उपक्रमांमुळे सुमारे अडीच लाख नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे, असे फडणवीस म्हणाले. नवीन बंकरिंग टर्मिनलचे (समुद्री पेट्रोल पंप) उद्‌घाटन, ड्राय डॉकचे कोचीन शिपयार्डला हस्तांतरण, जवाहर द्वीप येथे टॅंक फार्मसाठी रेक्‍लेमेशन तयार करण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन, देशांतर्गत क्रूझ टर्मिनलच्या इमारतीचे उद्‌घाटन आदी कार्यक्रमही या वेळी झाले. 

देशात आंतरराष्ट्रीय क्रूझमधून येत्या काही वर्षांत सुमारे लाखो परदेशी पर्यटक येणार आहेत. त्यातून परकीय चलन आपल्याला मिळणार आहे. तसेच सुमारे अडीच लाख नव्या रोजगारांची निर्मिती होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांना जहाजाच्या पुढे जाऊन सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी काही वेळ जहाजाच्या कडेला थांबून सेल्फी काढला आणि तोपर्यंत पोलिसांना त्यांच्यासाठी तेथेच थांबावे लागले. अमृता फडणवीस यांचा हा सेल्फी घेतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amruta Fadnavis selfie in Angria cruise Mumbai to Goa