Vidhan Sabha 2019 : आनंदराज आंबेडकर चेंबूरमधून निवडणुकीच्या रिंगणात?

मिलिंद तांबे
Saturday, 28 September 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ते चेंबूर मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे समजते आहे.

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ते चेंबूर मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे समजते आहे. वंचित आघाडीने अधिकृतपणे त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली नसली तरी लवकरच त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळत आहे.

आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष असून सध्या रिपब्लिकन सेना वंचित आघाडीत सोबत आहे.वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून आपल्या उमेदवारांची पहिली यादी ही त्यांनी जाहीर केली आहे.काल झालेल्या बैठकीत रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंदराज आंबेडकर यांनी चेंबूर मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी मागणी केली असता आनंदराज आंबेडकर ही त्यासाठी तयार झाले आहेत.

चेंबूर मतदार संघातून काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे 2004  आणि 2009 असे दोन वेळा निवडून आले आहेत.तर 2014 च्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांनी पराभव केला.आनंदराज आंबेडकर जर चेंबूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्यांना काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांच्याशी सामना करावा लागणार आहे.मात्र परंपरागत हा भाजपचा मतदारसंघ असल्याने यावेळी हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता आहे.

चेंबूर मतदार संघ हा कॉस्मोपोलिटन मतदार संघ असला तरी या मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतदार मोठ्या संख्यने आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी दक्षिण भारतीय आणि पंजाबी पॉकेट्स ही आहेत.मात्र लोकसभा निवडणूकीत वंचितला चांगली मतं मिळल्याने याही निवडणुकीत या मतदारसंघात वंचितला चांगली मत मिळण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anandraj Ambedkar wil elect Maharashtra vidhansabha election 2019 from chembur