...अन् मॉलमधून बिबट्याला केले जेरबंद

...अन् मॉलमधून बिबट्याला केले जेरबंद

ठाणे : ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती सकाळी 6.30 नंतर वाऱ्यासारखी समाजमाध्यमांवरून सर्वत्र पसरली. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मॉलमधून बिबट्या बाहेर पडल्याचे समजताच पोलिस व वन विभागाने बिबट्याचा शोध सुरू केला. अखेर सत्कार हॉटेलच्या तळमजल्यावर बिबट्याच्या हालचाली जाणवल्या. बिबट्याला जेरबंद करण्यापेक्षा बघ्यांच्या गर्दीला आवर घालणेच पोलिसांसमोर मोठे आव्हान होऊन बसले होते. सात तासांच्या अथक परिश्रमानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. 

दाट लोकवस्तीच्या ठाणे शहरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. बिबट्याने मध्यरात्री कॅडबरी कंपनीत प्रवेश करताना काही कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्यानंतर कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये बिबट्या असल्याचे दिसून आले. बिबट्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी, स्थानिक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून मॉलची पाहणी केली. मॉलचे सीसी टीव्ही चित्रीकरण तपासले असता पहाटे 5.29 च्या सुमारास बिबट्या मॉलच्या संरक्षक भिंतीवरून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले.

कोरम मॉलमधून बाहेर पडल्यानंतर हा बिबट्या कॅडबरी मिलच्या पाठीमागील बाजूने सत्कार हॉटेलच्या तळमजल्यावर असल्याचे कळताच सर्व यंत्रणांनी सत्कार हॉटेलकडे धाव घेतली. बिबट्याला पकडणे हे वन अधिकाऱ्यांपुढे आव्हान होते. त्यासाठी पिंजरे मागविण्यात आले आणि संजय गांधी उद्यानातील तज्ज्ञांनाही बोलाविण्यात आले.

बिबट्याचा शोध घेणे कठीण होते, त्यामुळे अखेर हॉटेलमालकांची परवानगी घेऊन फटाके वाजविण्यात आले. फटाक्‍यांच्या आवाजाने घाबरलेल्या बिबट्याची हालचाल टिपत 11.15 च्या सुमारास भूल देऊन बिबट्याला जेरबंद करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांनीही या वेळी घटनास्थळाची पाहणी केली. 

छायाचित्रकार, पत्रकारांना धक्काबुक्की 

बिबट्याला बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांना हटविताना पोलिस तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकार-छायाचित्रकारांनाही धक्काबुक्की केली. 

सकाळी 6.20 वाजता कोरम मॉल परिसरात बिबट्या आढळल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार इतर यंत्रणांच्या साह्याने आम्ही बिबट्याचा शोध घेतला. सत्कार हॉटेलच्या तळमजल्यावर बिबट्या आढळल्यानंतर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथेच त्याची रवानगी करण्यात आली आहे. 

- दिलीप देशमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com