अंधेरीचा रिक्षा डेक लवकरच - खासदार कीर्तिकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

मुंबई - वापराविना वर्षभर पडून असलेला अंधेरी रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील रिक्षा डेक (मिनी सॅटीस) सुरू करण्यास शनिवारी (ता. 11) रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली. "सकाळ'च्या बातम्यांची दखल घेत शनिवारी वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी रिक्षा डेकची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि ते सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

या डेकबाबत सर्वप्रथम "सकाळ'ने प्रकाश टाकला. 4 नोव्हेंबर 2016 आणि 3 मार्च 2017 ला "सकाळ'ने याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्याची दखल घेत कीर्तिकर यांनी शनिवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सर्व अडथळे दूर झाल्यावरही रेल्वे प्रशासन व वाहतूक पोलिस या रिक्षा डेकच्या वापरास परवानगी देत नव्हते. डेकमुळे रिक्षा थेट रेल्वेस्थानकातील प्रवासी पुलावरच येऊन उभ्या राहणार आहेत. त्यामुळे वृद्ध, आजारी, अपंग, गर्भवतींना जिने चढण्याच्या त्रासातून दिलासा मिळणार आहे.

कीर्तिकर यांनी अंधेरी येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी आमदार रमेश लटके, पश्‍चिम रेल्वेचे विभागीय अभियंता देवेश शर्मा, आरपीएफचे (अंधेरी) निरीक्षक मनीषसिंह राठोड, वाहतूक पोलिस निरीक्षक सागर कुलकर्णी, अंधेरी रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक सागर कुलकर्णी आदी उपस्थित होते. या वेळी रिक्षा डेकचा वापर सुरू का होत नाही, असा प्रश्‍न कीर्तिकर यांनी विचारला. सुरक्षेच्या दृष्टीने प्रवासी पुलावर नेणे योग्य ठरणार नाही, असे पोलिसांनी सांगितले; मात्र महापालिकेने एवढा खर्च करून बांधलेला रिक्षा डेक वापराविना ठेवण्यात अर्थ नाही. याचा वापर निदान प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावा, पोलिसांनी तेथे कडक बंदोबस्त ठेवावा, नंतर त्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असे कीर्तिकर यांनी सुचवले. त्यानुसार येथे महिनाभरासाठी वाहतूक सुरू करण्यात येईल, असे रेल्वे अभियंता शर्मा यांनी जाहीर केले.

Web Title: andheri rickshaw deck immediate