आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेड्डींच्या सचिवाच्या नावाने फसवणूक; आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे पीए नागेश्वर रेड्डी यांच्या नावाचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी 28 वर्षीय व्यक्तीला आंध्र प्रदेशमधून अटक केली.

Fraud News : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेड्डींच्या सचिवाच्या नावाने फसवणूक; आरोपी अटकेत

मुंबई - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे पीए नागेश्वर रेड्डी यांच्या नावाचा वापर करून एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी 28 वर्षीय व्यक्तीला सायबर गुन्हे शाखेने आंध्र प्रदेशमधून अटक केली आहे. नागराजू बुडुमुरू असे आरोपीचे नाव असून, मूळचा आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे. आरोपीने मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या नावाने एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला फोन करून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटला स्पॉन्सरशिप देण्यास सांगितल्याचा आरोप आहे. या माध्यमातून आरोपीने मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या नावे फोन

डिसेंबर 2022 मध्ये, कंपनीच्या कार्यालयाशी आरोपीने संपर्क केला. संपर्क साधल्यानंतर आरोपीने स्वतःला आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून खोटी ओळख सांगितली. फोन कॉलवर त्यांनी कंपनीच्या एमडीचा संपर्क क्रमांक मागितला. दक्षिण आफ्रिकेच्या एका माजी क्रिकेटपटूला स्वत:साठी क्रिकेट किट विकत घेण्याची गरज असून त्याला 12 लाख रुपयांच्या प्रायोजकत्वाची गरज असल्याचे आरोपीने फोनवर सांगितले होते. आरोपीने कंपनीकडून विविध खात्यावर 7.66 लाख रुपये वळते केले.

फसवणूक झाल्याचे उघड

अखेर कंपनीला त्यांच्याशी संपर्क साधलेल्या व्यक्तीने फसवणूक केल्याचे लक्षात आले आणि 13 जानेवारी रोजी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिस अधिकार्‍यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पथकाने संशयिताचे तपशील, त्याने वापरलेली बनावट कागदपत्रे आणि कंपनीला 7.66 लाख रुपयांची फसवणूक करण्यासाठी वापरलेल्या बँक खात्याचा तपशील जप्त केला.

पोलीस तपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर क्राईम सेलच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने या प्रकरणात तांत्रिक पुराव्यांचा वापर करत संशयिताचे ठिकाण शोधण्यात यश मिळविले. त्याप्रमाणे पोलीसांचे पथक आंध्र प्रदेशला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला श्रीकाकुलम येथे ताब्यात घेण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने कारवाया करण्यासाठी क्रिकेटपटूचा बनवत ईमेल आयडी तयार केला होता. इलेक्ट्रॉनिक कंपनीला फसवण्यासाठी त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि आंध्र क्रिकेट असोसिएशनची बनावट कागदपत्रे व्हॉट्सअॅपद्वारे कंपनीला पाठवली. आरोपिकडून अशाच प्रकारची फसवणूक आणखी किती जणांची झाले आहे. याचा शोध पोलीस करत आहेत.