धोकादायक इमारतीत अंगणवाडी

सकाळ वृत्‍तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मुलांचा जीव धोक्‍यात; बौद्धवाडा कोटगाव येथील प्रकार

मुंबई : उरण नगरपालिका आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या ‘हम करे सो कायदा’ या कारभारामुळे बौद्धवाडा कोटगाव येथील अंगणवाडी क्रमांक २ धोकादायक इमारतीत भरवण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या १५ लहान विद्यार्थ्यांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे.

उरण नगरपालिकेच्या हद्दीत ८४ धोकादायक इमारती असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. धोकादायक इमारतींमध्ये कोणीही राहू नये, अशा प्रकारच्या नोटिसाही इमारतींमधील रहिवाशांना देण्यात आल्या आहेत. अंगणवाडी भरवण्यात येणारी इमारत धोकादायक असल्याचे बॅनर इमारतीवर लावण्यात आले आहेत. त्यामध्ये उरण मच्छी मार्केटजवळील समाज मंदिर या इमारतीचाही समावेश आहे; 

धोकादायक इमारतींमध्ये उरण नगरपालिका आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना- उरणच्या प्रशासनाने अंगणवाडी क्रमांक २ ची शाळा भरण्यास आणि नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाला राहण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे धोकादायक असताना पालिकेने इमारतींना परवानगी दिलीच कशी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.  

नगरपालिकेने ही जागा अंगणवाडीसाठी दिली होती. धोकादायक इमारत असल्याने भाड्याने जागा मिळेपर्यंत  ही अंगणवाडी मदतनीसांच्या घरी भरवली जाणार आहे.
- एफ. एस. रॉडरिक, एकात्मिक बाळ विकास योजना सुपरवायझर

ही इमारत धोकादायक असल्याने आम्ही येथे शाळा भरवण्यास बंद केली आहे; मात्र तरीही शाळा भरवण्यात येत असल्यास ती त्वरित बंद केली जाईल.
- रवी भोईर, सभापती, पालिका, शिक्षण सभापती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganwadi in a dangerous building