"उमटे'चे पाणी तापले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

उमटे धरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. त्यानंतरही परिसरातील तब्बल 60 गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांतील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

अलिबाग  : तालुक्‍यातील उमटे धरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. त्यानंतरही परिसरातील तब्बल 60 गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांतील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी हस्तक्षेप करून धरणाचे काम अजून पूर्ण झाले नाही, असे स्पष्टीकरण दिल्याने तणाव काहीसा कमी झाला. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. 

पनवेल पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले आहे. त्यामध्ये काही गावे समाविष्ट झाली आहेत. त्यांच्या 51 शाळा आता महापालिकेत हस्तांतर करण्याची मागणी या महापालिकेने केली आहे. याबाबत सुरेश खैरे यांनी जाब विचारला. चित्रा पाटील यांनीही जिल्हा परिषदेची जागा का द्यावी, असा प्रश्न उपस्थित केला. 

त्यानंतर उमटे धरणाच्या पाणी शुद्धीकरण केंद्राचा मुद्दा उपस्तित करण्यात आला. या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. कंत्राटदाराला निधीही वर्ग करण्यात आला. तरीही या परिसरातील गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे, त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी केला. 

या वेळी उपाध्यक्ष ऍड. आस्वाद पाटील यांनी सांगितले की, पाणी शुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण आहे. त्यांना अजून काही रक्कम देण्यात येणार आहे. आदिती तटकरे यांनी सांगितले की, गणेशोत्सवापूर्वी केंद्र सुरू होईल. धरणातून पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतही या वेळी चर्चा झाली. 

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, समाजकल्याण सभापती नारायण 
डासमे, शिक्षण सभापती नरेश पाटील, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंडे, कृषी, पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील, कुंदा ठाकूर, ऍड. नीलिमा पाटील, दिलीप भोईर, सुरेश खैरे, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे आदी उपस्थित होते. 

उरणमधील वाहतूककोंडी संतापजनक 
उरण तालुक्‍यात अवजड वाहतुकीमुळे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कुंदा ठाकूर यांनी मांडला. बेदरकार वाहतुकीमुळे तालुक्‍यात दररोज अपघात होत आहेत. हे पाप जेएनपीटी आणि तीन बंदरांचे आहे, असा आरोप त्यांनी केला. गणेशोत्सवापूर्वी यावर उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anger due to contaminated water