आंग्रीया क्रूझ लवकरच सेवेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

मुंबई - देशातील पहिली आंतरदेशीय क्रूझ ‘आंग्रीया’ पुढील आठवड्यापासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे.  पाच ते १० हजारांच्या प्रवास शुल्कात या क्रूझमधून मुंबई ते गोव्यापर्यंत पर्यटकांना सफरीचा आनंद लुटता येणार आहे.

मुंबई - देशातील पहिली आंतरदेशीय क्रूझ ‘आंग्रीया’ पुढील आठवड्यापासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे.  पाच ते १० हजारांच्या प्रवास शुल्कात या क्रूझमधून मुंबई ते गोव्यापर्यंत पर्यटकांना सफरीचा आनंद लुटता येणार आहे.

आंग्रीया क्रूझचे शनिवारी (ता. २०) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. ३९९ पर्यटक या क्रूझमधून प्रवास करू शकतात. यात १०४ खोल्या आहेत. जपान येथून मागवण्यात आलेल्या या क्रूझमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रवासाचे दर पाच हजारांपासून १० हजारांपर्यंत आहेत. त्यात चहा, कॉफी, नाश्‍ता, रात्रीचे जेवण आदी दिले जाणार आहे. www.angriyacruise.com या संकेतस्थळावरून या क्रूझसाठी आरक्षण करता येईल, अशी माहिती आंग्रीया क्रूझच्या सह व्यवस्थापक लीना प्रभू कामत यांनी दिली. बुधवारी (ता. २४) सायंकाळी ४.३० वाजता ही क्रूझ मुंबईहून वॉस्कोसाठी रवाना होईल. हा प्रवास १४ तासांचा असून दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता ती वास्को येथे पोहोचेल. तीन दिवस मुंबई आणि तीन दिवस गोवा असा तिचा प्रवास असेल, असे क्रूझचे कॅप्टन नितीन धोंड यांनी सांगितले.

क्रूझची वैशिष्ट्ये
छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी महाराष्ट्रातील समुद्रावर मराठ्यांचे आरमार उभे केले. त्यांचा इतिहास कथन करणारी चित्रे आणि माहिती क्रूझवर प्रदर्शित करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचे दर्शन क्रूझवरील सजावटीतून पर्यटकांना पाहायला मिळेल. कोकणातील संस्कृती पर्यटकांना अनुभवता येईल. क्रूझमधील खोल्यांना वसई, अर्नाळा, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग अशी नावे देण्यात आली आहेत.

Web Title: angriya Cruise