मुंबईत साकारतेय जागतिक दर्जाचे पशुवैद्यकीय रुग्णालय

विजय गायकवाड
बुधवार, 11 एप्रिल 2018

जागतिक दर्जाच्या  पशुवैद्यकीय सेवा मिळतील  - माफसू' विद्यापीठाचे  कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर 
"महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या अखत्यारीतील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात ७ एकरवर  हॉस्पिटल उभारण्याचा टाटा ट्रस्टचा  प्रस्ताव आहे. जागतिक दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा मिळण्याबरोबरच पशुवैदयकीय विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर  प्रशिक्षणासाठी पायाभुत सुविधा उभ्या राहतील. डॉ. आमटे नियुक्त समिती आणि कार्यकारी परिषदेच्या मान्यतेनेच आधुनिक पशुवैद्यकीय  रुग्णालयाची उभारणी होईल."

मुंबई : मुंबईतील बैलघोडा रुग्णालयावरचा वाढता ताण आणि खाजगी रुग्णालयांमधे प्राण्यांच्या उपचारासाठी होणारी आर्थिक पिळवणुक रोखण्यासाठी मुंबईत लवकरच जागतीक दर्जाचे पशुवैद्यकीय रुग्णालय साकारणार आहे. टाटा ट्र्स्टने याकामी पुढाकार घेतला असून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने प्राणी उपचारासाठी जागतिक दर्जाची सुविधा सुरु होणार आहे.

मुंबई शहराला प्राणी संरक्षणाचा इतिहास आहे. सर दिनशा मानोकजी पेटीट यांनी १८८३ मध्ये उभारलेले 'द बाई साकरबाई दिनशा पेटीट' पशुरुग्णालय 'बैलघोडा' रुग्णालय म्हणुन ओळखले जाते.

मुंबईतील मध्यवस्तीत परेल येथे असलेले हे रुग्णालय प्राणीसेवेसीठी अपुरे पडत आहे. शहरात असलेले खाजगी पशुवैद्यकीय भरमसाठ फी आकारत असल्याने मुकी जनावरं उपचारा अभावी जीवाशी जात असल्याचा प्राणिप्रेमींचा आक्षेप आहे. 

टाटा ट्रस्टच्या वतीने अत्याधुनिक सुविधायुक्त जागतिक दर्जाचे  रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे  सादर केला आहे. जवळपास यासाठी १५० कोटीची गुंतवणुक ट्रस्ट करणार आहे. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या परेल आणि गोरेगाव आवारात यासाठी ७ एकर क्षेत्र भाडेतत्वावर घेण्यात येईल. यामधे सर्व प्रकारच्या  प्राण्यांचे प्राथमिक उपचार, आपत्कालीन कक्ष, शस्त्रक्रीया आणि सोनोग्राफी व तत्सम तपासणी सुविधा उभारण्यात येतील.

या प्रस्तावासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  अध्यक्षतेखाली डिसेंबर  २०१७ मधे  बैठक पार पडली होती.  कुलगुरुपद रिक्त असल्याने मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने  सदर प्रस्ताव महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या कार्यकारी परीषदेत चर्चीला गेला आहे. याबाबत कार्यकारी परीषदेने काही प्रश्न उपस्थित केले आहे. यासंबधीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मुंबईसह  उदगिर ( लातूर) आणि नागपूरमधे अशा प्रकारचे  प्राणि रुग्णालये  उभारण्याच्या व्यवहार्यतेवर समिती अहवाल सादर करणार आहे, असे ' माफसू' विद्यापीठाचे  कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर  यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

जागतिक दर्जाच्या  पशुवैद्यकीय सेवा मिळतील  - माफसू' विद्यापीठाचे  कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर 
"महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या अखत्यारीतील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात ७ एकरवर  हॉस्पिटल उभारण्याचा टाटा ट्रस्टचा  प्रस्ताव आहे. जागतिक दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा मिळण्याबरोबरच पशुवैदयकीय विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर  प्रशिक्षणासाठी पायाभुत सुविधा उभ्या राहतील. डॉ. आमटे नियुक्त समिती आणि कार्यकारी परिषदेच्या मान्यतेनेच आधुनिक पशुवैद्यकीय  रुग्णालयाची उभारणी होईल."

Web Title: animal hospital in Mumbai