सूरबहारवादक अन्नपूर्णादेवी यांचे निधन

Annapurnadevi
Annapurnadevi

मुंबई - भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये वेगळा ठसा उमविणाऱ्या प्रख्यात सूरबहारवादक ‘पद्मभूषण’ अन्नपूर्णादेवी (वय ९१) यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. 

ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. अन्नपूर्णादेवी यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील एक व्रतस्थ तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. अन्नपूर्णादेवी या मागील काही वर्षांपासून आजारी होत्या.

वयोमानामुळे त्यांना शारीरिक त्रासही जाणवत होता. प्रकृती खालावल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान शनिवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

अन्नपूर्णादेवी यांचा जन्म मध्य प्रदेशातील मैहर येथे १९२७ मध्ये झाला. प्रसिद्ध संगीतकार अलाउद्दीन खाँ हे त्यांचे वडील. त्यांच्याकडूनच त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे मिळाले होते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सतार व सूरबहार वादनावर हुकूमत मिळवली. पुढे सूरबहार वादनाशी त्यांचे नाव जोडले गेले. लहान वयातच त्यांनी इतरांना शास्त्रीय संगीताचे धडे देण्यास सुरवात केली होती. प्रख्यात सतारवादक पंडित रवी शंकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरी), सुधीर फडके, निखिल बॅनर्जी, आशीश खान (सरोद), अमित भट्टाचार्य (सरोद) व वसंत काब्रा (सरोद) यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ सन्मान देऊन गौरविले होते. तसेच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

संगीतप्रसाराचे व्रतस्थ कार्य
अन्नपूर्णादेवी यांनी आयुष्यभर शास्त्रीय संगीत प्रसाराचे कार्य व्रतस्थपणे केले. शिष्यांच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्मनातील सुरांच्या संपत्तीची सर्वांना प्रचीती आली. सतार, सरोद, बासरी या वाद्यांच्या विद्यादानाचे कार्य त्यांनी निरपेक्षपणे पार पाडले. शिष्यांकडून त्या केवळ जगण्यापुरते आवश्‍यक शुल्क आकारत. १९६२ नंतर त्या कोणत्याही मैफलीत सहभागी झाल्या नाहीत. त्यानंतर मुंबईत येऊन त्यांनी विद्यादानाचे कार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com