सीडीआरप्रकरणी आणखी एक खासगी गुप्तहेर जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

ठाकूर याने कीर्तेश कवी या गुप्तहेरामार्फत सीडीआर मिळवून विक्री केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीत उघड झाली आहे. ठाकूर याला न्यायालयाने 14 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.

ठाणे : बेकायदा सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) प्रकरणात आणखी एक खासगी गुप्तहेराला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या 14 झाली आहे. लक्ष्मण ठाकूर असे त्याचे नाव असून ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ने त्याला मुंबईतून अटक केली. 

ठाकूर याने कीर्तेश कवी या गुप्तहेरामार्फत सीडीआर मिळवून विक्री केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीत उघड झाली आहे. ठाकूर याला न्यायालयाने 14 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली. बेकायदा सीडीआरप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित हिच्यासह पोलिस कॉन्स्टेबल नितीन खवडे, ऍड. रिझवान सिद्धिकी, माकेश पांडीयन, प्रशांत पालेकर, जिगर मकवाना आदींसह 13 आरोपींना अटक केली आहे. यातील रिझवान याला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोडून द्यावे लागले. 

न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात गुन्हे शाखेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असतानाच सीडीआर प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या चौकशीत लक्ष्मण ठाकूर या खासगी गुप्तहेराचे नाव समोर आले. पूर्वी खासगी गुप्तहेर असलेला कीर्तेश कवी याच्याकडे ठाकूर काम करत होता.

त्याच्यामार्फतच त्याने मोबाईलधारकांचे सीडीआर मिळवून विकल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री सांताक्रूझ, जुहू कोळीवाडा भागातून ठाकूरला अटक केली. 

Web Title: Another private detective involved in the CDR case