पेणनजीक खड्ड्याचा आणखी एक बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

खड्ड्यात दुचाकी आदळून रस्त्यावर पडलेल्या एअर इंडिया अधिकाऱ्याला मागून आलेल्या एस. टी. बसने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला

पेणः खड्ड्यात दुचाकी आदळून रस्त्यावर पडलेल्या एअर इंडिया अधिकाऱ्याला मागून आलेल्या एस. टी. बसने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 22) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्‍यातील बळवली गावानजीक घडली. 
अझीम युनूस मिरकर (54) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी फिर्यादी अमन मिरकर (रा. नवी मुंबई) हे अझीम याच्यासोबत दुचाकी (क्र. एम.एच. 43 एई 9458)ने मुंबई-गोवा महामार्गावरून पनवेलकडून महाडकडे जात असताना बळवली गावाच्या हद्दीतील मारुती मंदिरासमोर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून अझीम मिरकर हे खाली पडले. याच वेळी पाठीमागून ठाण्यावरून अलिबागकडे जाणारी एसटी बस (क्र. एम.एच.07 सी- 9182)च्या मागच्या चाकाखाली सापडून अझीम यांचा जागीच मृत्यू झाला; तर अमन मिरकर जखमी झाले. 
अपघातानंतर जवळच्या कल्पेश ठाकूर व दादर सागरी पोलिस, वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले. याप्रकरणी दादर सागरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दादर सागरी पोलिस करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another victim of a peanutic ditch