ध्रुपद आलापाची जुगलबंदी आणि कथ्थक; नृत्याविष्काराने रंगली 'अनुनाद'ची मैफल; रसिक झाले मंत्रमुग्ध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

"या पुढेही दरवर्षी अशा मैफली पुरातन वास्तूंमध्ये आयोजित करण्यात येणार - मृणाल पवार, सकाळ संचालिका 

मुंबई -  चित्रांच्या साथीने ध्रुपद आलापचा नाद... संथगतीने सुरू झालेला आलाप उत्तरोत्तर जुगलबंदीत रंगत जातो आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. हाच अनुभव रसिकांना गुंदेचा ब्रदर्स म्हणून प्रसिद्ध असलेले उमाकांत गुंदेचा व त्यांचे पुतणे अनंत गुंदेचा यांच्या आगळ्यावेगळ्या मैफलीतून आला. ध्रुपद आलापाची जुगलबंदी उमाकांत आणि अनंत गुंदेचा यांनी सादर करत रसिकांना तल्लीन केले. याचबरोबर प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगणा प्रेरणा देशपांडे यांनी कथ्थकच्या पारंपरिक रचनांवर आपली अनोखी नृत्यशैली सादर करत रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. रसिकांनी दोन्ही सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात भरभरुन दाद दिली.

Image may contain: 4 people, people sitting and indoor

 

"सकाळ'च्या "अनुनाद' या कार्यक्रमाद्वारे मंदिरे किंवा सांस्कृतिक वारशाच्या ठिकाणी नृत्य-गायनाच्या मैफली होतात. बंदिस्त देऊळ किंवा पुरातन वास्तूंमध्ये कोणत्याही संगीत वाद्याशिवाय केवळ तानपुराच्या साथीने गायन आणि नृत्य सादरीकरण केले जाते. अशा पुरातन वास्तूंमध्ये अशा संगीत मैफली करताना ध्वनी यंत्रणेची आणि वाद्यांची गरज भासत नाही. अशा प्रकारची "अनुनाद'ची वेगळी संकल्पना सकाळच्या संचालिका मृणाल पवार यांची आहे. यापूर्वी "अनुनाद'च्या मैफली पुण्यामध्ये, नाशिकमध्ये झाल्या.

Image may contain: 1 person, standing and indoor

या पुढेही दरवर्षी अशा मैफली पुरातन वास्तूंमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत, या संकल्पनेबाबत 'सकाळ'च्या संचालिका मृणाल पवार म्हणाल्या की, अशा प्रकारची आगळी वेगळी संकल्पना भारतात किंवा जगात कुठेही सादर केली जात नाही, ती केवळ सकाळच्या 'अनुनाद'मध्ये रसिकांना अनुभवता येते. काळाघोडामध्ये झालेल्या कार्यक्रमात उमाकांत व अनंत गुंदेचा आणि प्रेरणा देशपांडे यांचे अप्रतिम सादरीकरण झाले. खूप वेगळा अनुभव या सादरीकरणाने प्रेक्षकांना दिला. या आर्ट गॅलरीमध्ये चित्रकार सुधीर पटवर्धन यांचे प्रदर्शन सुरू आहे, या माहोलमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम रसिकांना अद्‌भुत अनुभव देऊन जातो. 

Image may contain: 3 people, people sitting

शनिवारी संध्याकाळी "सकाळ'च्या "अनुनाद' व "काळाघोडा महोत्सव' यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे आयोजित करण्यात आला होता. या मैफलीत गेली तीन दशके ध्रुपद गायकीत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ गायक उमाकांत गुंदेचा व त्यांचे पुतणे अनंत गुंदेचा तसेच कथ्थक गुरू डॉ. रोहिणी भाटे यांच्या शिष्या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कथ्थक नृत्यांगणा प्रेरणा देशपांडे या दिग्गजांचा समावेश होता. 

Image may contain: 1 person, shoes and indoor

उमाकांत गुंदेचा म्हणाले, आतापर्यंत ज्या मैफली आम्ही सादर केल्या त्यापेक्षा आजची मैफली खूप वेगळी होती. कोणत्याही संगीत साधनाशिवाय केवळ तानपुराच्या आधारावर ध्रुपद आलाम सादर करणे, हा आमच्यासाठी खूप विलक्षण अनुभव होता. "कस्तुरी तिलकम्‌' या वंदनेने प्रेरणा देशपांडे यांनी आपल्या नृत्याची सुरूवात केली. आमद, परणजुडी आमद, तोडे, तिहाई, परण अशा कथ्थकच्या तीन तालातील पारंपरिक रचनांचे सादरीकरण केले. त्यांनी सादर केलेल्या तिहाईमधील पायांची वैविध्यपूर्ण रचना उपस्थित प्रेक्षकांना अचंबित करत होत्या. प्रेरणा देशपांडे यांनी आपल्या गुरू रोहिणी भाटे यांनी रचलेल्या दोन अभिनय रचना प्रस्तुत केल्या. प्रेरणा यांच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव, लयबद्ध नृत्यशैली पाहताना उपस्थित प्रत्येक प्रेक्षक त्यांच्या सादरीकरणामध्ये मंत्रमुग्ध झाला होता. 

Image may contain: 1 person, sitting and shoes

या अनोख्या नृत्याच्या सादरीकरणाविषयी प्रेरणा देशपांडे म्हणाल्या, कथ्थक नृत्याचे सौंदर्य संवादिनी आणि तबल्याच्या ठेक्‍याने वाढते. पण आजच्या कार्यक्रमात कोणत्याही वाद्यांशिवाय कथ्थकच्या पारंपरिक रचना केवळ लाईव्ह गाण्याच्या पार्श्वभूमीवर आणि हातावरील तालाच्या आधारे सादर करायची होती. आतापर्यंत अशा प्रकारचे सादरीकरण मी यापूर्वी केलेले नाही. प्रथम असा प्रयत्न केला आणि प्रेक्षकांनाही तो आवडला. आजच्या सादरीकरणाचा अनुभव अतिशय वेगळा होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anunad audience at kalaghoda mesmerized after dhrupad jugalbandi and Kathak performance